Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Marathwada › डॉक्टरांअभावी ताटकळले रुग्ण

डॉक्टरांअभावी ताटकळले रुग्ण

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:41AMपाटोदा : प्रतिनिधी

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच वादग्रस्त ठरत असलेल्या पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरासाठी आलेल्या महिला रुग्णांना डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याने तासन्तास ताटकळत बसण्याची वेळ आल्याची घटना गुरुवारी घडली आहे.

पाटोदा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार दि.4 मे रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला रुग्णांनी नोंदणी केली होती. शस्त्रक्रियेपूर्वीच्या आवश्यक त्या तपासण्या (रक्त, लघवी इत्यादी) करण्यासाठी गुरुवारी दुपार पासूनच महिलांनी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. यावेळी काही महिलांची तपसणीची प्रक्रिया करण्यात आली, मात्र यानंतर काही वेळातच डॉक्टर व कर्मचारी या महिला रुग्णांची तपासणी न करताच तेथून निघून गेले त्यामुळे ग्रामीण भागातून कडक उन्हाच्या कडाक्यात आलेल्या या महिलांना तासन्तास याठिकाणी ताटकळत बसावे लागले व त्यांचे प्रचंड हाल झाले. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात सुरुवाती पासूनच तज्ञ डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. नारायण गाडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी केवळ सर्व प्रक्रिया पूर्ण करून या रुग्णांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याचे मोगम उत्तर दिले.