Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Marathwada › परळी  : दोन शिक्षकांचा कालव्यात बुडून मृत्यू

परळी :  दोन शिक्षकांचा कालव्यात बुडून मृत्यू

Published On: Apr 19 2018 4:05PM | Last Updated: Apr 19 2018 4:05PMपरळी  प्रतिनिधी  

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील गोवर्धन हिवरा कालव्यात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या दोन शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना बुधवार दि १८ रोजी सायंकाळी घडली. हे दोन्ही शिक्षक मुळचे दिल्ली येथील रहिवासी आहेत.

भानु प्रकाश (वय 22) आणि शुभमकुमार सिन्हा (वय 23) अशी या दोन्ही मयत शिक्षकांची नावे आहेत. हे दोघेही विवाहित आहेत. भानूप्रकाश हे सिरसाळा येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी या इंग्रजी शाळेत तर शुभमकुमार हे माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील सरस्वती पब्लिक स्कूल या शाळेत शिक्षक होते. शाळेनंतर दोघेही माजलगावला जाऊन शिकवणी घेत असत. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास माजलगाव येथून शिकवणी घेऊन माघारी येत असताना आंघोळीसाठी ते गोवर्धन हिवरा येथील कालव्यामध्ये उतरले. परंतु, पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि वाहून गेले. दोघांचेही शव आज दि. १९ एप्रिल रोजी सकाळी सबराबाद शिवारातील एका पुलास अडकलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि दोघांचेही शव अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, दोघांच्याही कुटुंबियांना दुर्घटनेबद्दल माहिती देण्यात आली असून, ते अंबाजोगाईला येण्यासाठी निघाले असल्याचे समजते.