Fri, Sep 20, 2019 07:27होमपेज › Marathwada › परळीचे औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू

परळीचे औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू

Published On: Aug 22 2019 7:29PM | Last Updated: Aug 22 2019 7:29PM
 परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...

पाणी व कोळसा अभावी बंद करावे लागलेले परळीचे औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून खडका बंधारा येथे पाणी सोडण्यात आल्यानंतर औष्णिक विद्युत केंद्राच्या 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात सुरू झाला आहे .यामधून वीज निर्मिती सुरू झाली असून, आज या संचातून 168 मेगावॅट वीज निर्माण झाली आहे.

परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून पाण्याअभावी वीज निर्मिती  करणे थांबवले होते. पैठण येथील नाथ सागर मधून 11 ऑगस्ट रोजी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाणी सोडण्यात आले. खडका येथील बंधाऱ्यात हे पाणी मंगळवारी पोहोचले. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास संच क्रमांक सात मधून वीजनिर्मितीला सुरुवात झाली. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात 250 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक सहा, सात, आठ हे तीन संच असून, एकूण क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. 

यापैकी संच क्रमांक सात सद्यस्थितीला सुरू झाला आहे. याबाबत औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, 250 मेगावॅटचा संच क्रमांक सहा लवकरच सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले, तर संच क्रमांक आठ मध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी सध्या कामे सुरू आहेत. त्यामुळे हा उशिरा सुरू होणार आहे. औष्णिक विद्युत केंद्रासाठी आवश्यक असणारा कोळसा पुढील वीस ते पंचवीस दिवस पुरेल एवढा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान खडका येथील बंधाऱ्यातून परळी शहरासाठी पाणीपुरवठा करावा ही मागणी सातत्याने सुरू असली, तरी औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती सुरू झाल्याने शहरासाठी या बंधाऱ्यातून पाणी मिळेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex