Sat, Jul 20, 2019 10:43होमपेज › Marathwada › खोदकामावेळी प्रगट झाले भगवान विष्‍णू आणि नागराज

खोदकामावेळी प्रगट झाले भगवान विष्‍णू आणि नागराज

Published On: Apr 16 2018 8:47PM | Last Updated: Apr 16 2018 10:52PMपरळी वैजनाथ : रविंद्र जोशी

अंबाजोगाई रोडवर कन्हेरवाडीच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम चालू असताना एक पुरातन मुर्ती सापडली आहे. त्या मुर्तीभोवती एक भला मोठा नाग वेटाळे घालून बसल्याचे खोदकाम करणाऱ्याला दिसून आले. ही वार्ता सगळीकडे पसरताच ही मुर्ती व नाग पाहण्यासाठी लहान थोर महिला यांची गर्दी उसळली. खोदकामामध्ये विष्णूची पुरातन सुबक मूर्ती सापडली आहे. या मुर्तीचा अर्धा भाग भग्न आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाच्यावतीने पहाणी केल्यानंतरच या मुर्तीविषयी अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. 

परळीपासून जवळच असलेल्या कन्हेरवाडीच्या अलिकडील डोंगराचे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. या खोदकामातून निघणारी माती, दगड धोंडे, मुरूम परळी ते अंबाजोगाई केंद्रीय राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्‍या कामासाठी वापरण्यात येत आहे. आज सोमवार, दि.16 रोजी सकाळी 10 वाजता जेसीबीने डोंगर फोडत असताना माथ्‍यापासून ते जमिनीपर्यंतच्या 25 फुट खाली अंतरावर प्राचीन मुर्ती आढळून आली.

त्या मुर्तीच्या पठोपाठच अचानक एक भला मोठा नाग मुर्तीजवळ वेटोळे घालून बसला. जेसीबी चालकाने पुन्हा डोंगर खोदण्याचा प्रयत्न केला असता, त्या भल्या मोठ्या नागाने आपला फणा वर करून जोराचा फुत्कार सोडला हे दृश्य पाहून जेसीबी चालकाने जेसीबी मागे घेऊन पळ काढला व जेसीबी गेल्यानंतर तो नाग मुर्तीला वेटोळे घालून बसला ही वार्ता सर्वत्र पसरताच तेथे बघ्यांची गर्दी उसळली. सदर ठिकाणी परळीचे तहसीलदार शारद झाडके, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

दुर्मिळ मुर्ती निघाली; अनेक अवशेषांची शक्यता ,पुरातत्व विभागाच्या पहाणीनंतर होणार स्पष्ट

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. शहर व पंचक्रोशीत पुरातन व ऐतिहासिक मंदिरे, शिल्प ,आवशेष आढळून येतात. पुरातत्व विभागाच्या वतीने या ठिकाणी यापूर्वी काहीही लक्ष केंद्रित केले नाही तसेच हे पौराणिक स्थळांचे जतन करण्यासाठी काही विशेष प्रयत्न ही करण्यात आलेले नाहीत. पुरातत्व विभागाच्यावतीने प्रयत्न केल्यास परळी व परिसरात अनेक दुर्मिळ प्राचीन अवशेष हाती लागू शकतात.

११ व्या शतकातील यादवकालीन व चालुक्यांचा प्रभाव असलेल्या या परिसरात पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाच्यावतीने शोधकार्य हाती घेतले तर पुरातन वारसा असणारी अनेक स्थळे, वास्तू, दुर्मीळ मुर्त्या या ठिकाणी मिळू शकतात. 

बघ्यांची गर्दी अन् तर्क वितर्कांना उधाण

खोदकाम करत असताना मुर्ती सापडल्‍याची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण परळी शहर व परिसरात  पसरल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सोशल मीडियातून छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारीत झाले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.

येथे येणार्‍या नागरिकांनी या मुर्तीवर पुष्पहार, गुलाल वाहत त्या ठिकाणी मुर्तीची पूजा केली. या घटनेनंतर चर्चेला उधाण आले असून अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावले जात आहेत. डोंगर माथ्‍यापासून ते जमिनीपर्यंतच्या 25 फुट खाली अंतरावर मुर्ती आली कशी? याठिकाणी कपारीत एखादे प्राचीन मंदिर आहे का?  मुर्ती आणि त्यावरील अस्सल नागराज असे लक्षण म्हणजे गुप्तधनाचा साठा असेल का? या  ठिकाणी प्राचीन खजाना असेल अशा अनेक तर्क वितर्कांना या परिसरात उत आला आहे.

पुरातत्व खात्याकडून पहाणी

मुर्ती सापडल्‍याची माहिती पुरातत्व खात्याला तातडीने कळवण्यात आली. ही घटना कळाल्यानंतर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी दखल घेऊन पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक कार्यालयातील कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवले. पुरातत्व खात्याच्या वतीने पाहणी करण्यात आली असून, लवकरच तज्ञ पथक मुर्ती व जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे या ठिकाणी उत्खनन करणे, शोधकार्य करणे होणार आहे.

दरम्यान या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत. नागरीक या ठिकाणी मोठय़ा संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असून नागरिकांनी शांतता प्रस्थापित ठेवावी, मुर्तीचे दुरून दर्शन घ्यावे, पुरातत्व विभागाच्या शोधकार्यासाठी मुर्ती आहे त्या अवस्थेत राहणे गरजेचे आह त्यामुळे मुर्तीला हात लावू नये. सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन परळी वैजनाथचे तहसीलदार शरद झाडके यांनी केले आहे.

कण्हेरवाडीतील ती मूर्ती सुर्यदेवतेची.....

दरम्‍यान आज सापडलेली मुर्ती भगवान विष्‍णूची नसून ती सुर्यदेवाची असल्‍याची माहिती प्रसिद्ध मूर्ती अभ्यासक तथा इतिहास संशोधक डॉ अरुंचंद्र पाठक यांनी पुढारीशी बोलताना दिली . 

त्‍यांच्या मते कण्हेरवाडी येथे सापडलेली मूर्ती सूर्याची असून ती बाराव्या शतकातील आहे. राष्कुट राजा इंद्र दुसरा याचा ताम्रपट परळी येथे सापडला होता, यावरून कण्हेरवाडीत  आणखीही मूर्ती मिळू शकतात, त्यामुळे त्या परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.