होमपेज › Marathwada ›  ग्रामपंचायत पोटनिवडणूक पंकजा मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व

 ग्रामपंचायत पोटनिवडणूक पंकजा मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:28PM



परळी : प्रतिनिधी

परळी मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा  मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड करत भाजपने सहा पैकी चार ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे पंकजा  मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन, सोनहिवरा व बोरखेड तसेच अंबाजोगाई तालुक्यातील राडी, राडी तांडा व बागझरी येथे सरपंच व सदस्यांसाठी तर परळीतील टोकवाडी, जिरेवाडी, डिग्रस येथे सदस्यांच्या प्रत्येकी एका जागेकरिता सोमवारी पोटनिवडणूक झाली होती.

बुधवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. बहुचर्चित व राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय प्रतिष्ठेची केलेली हिवरा गोवर्धन ग्रामपंचायत भाजपचे माजी जि. प. सदस्य वृक्षराज निर्मळ यांच्या ताब्यात आली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारूण पराभव करत त्यांच्या पत्नी वर्षा निर्मळ ह्या गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. नऊ सदस्यांच्या या ग्रा. पं. मध्ये वृक्षराज निर्मळ गटाचे प्रदीप रासवे, लता ठोंबरे, पद्मिन निर्मळ, सगुणा राठोड, पंचशीला गावडे, सुवर्णा निर्मळ हे सहा सदस्य निवडून आले.    

 सोनहिवरा ग्रामपंचायतीत भाजप नेते श्रीहरी मुंडे यांच्या पॅनलचा विजय झाला. शशिकला सरवदे या सरपंच म्हणून तर सतीश मुंडे, संतोष मुंडे, गोविंद मुंडे, पूजा मुंडे, उषा पवार, सुशीला बनसोडे हे सदस्य विजयी झाले. एका उमेदवाराचा फक्त दोन मतांच्या फरकाने पराभव झाला. जिरेवाडी येथे एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रणिता मुंडे यांचा विजय झाला. राडी तांडा व बागझरी या दोन्ही ग्रामपंचायती भाजपकडे आल्या. प्रयागबाई आडे या राडी तांड्याच्या तर विनोद लहाने हे बागझरीचे सरपंच म्हणून विजयी झाले. काशीनाथ आडे, सागरबाई आडे, गोपीचंद आडे, सपना चव्हाण, रामचंद्र आडे, गिरजाबाई आडे व किसाबाई राठोड हे सातही सदस्य विजयी झाले. बागझरी मध्ये सात पैकी आश्विनी फड, गीता लहाने, जयश्री आचार्य, दत्ता काटे, कल्पना बोबडे यांचा विजय झाले.