Wed, May 22, 2019 10:50होमपेज › Marathwada › जिल्ह्यात दोनशे इंग्रजी शाळांमध्ये 2706 जागा आरटीईने भरणार

जिल्ह्यात दोनशे इंग्रजी शाळांमध्ये 2706 जागा आरटीईने भरणार

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:55AMबीड : प्रतिनिधी

आरटीई अंतर्गत 200 पात्र शाळामध्ये 2706 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.  जिल्ह्यामध्ये दि. 7 मार्च पर्यंत 4235 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरले होते, परंतु या अर्जापैकी 1268 पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाइन प्रवेश कन्फर्म केले नाहीत. यामुळे 2975 अर्ज दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांमधून लॉटरी पद्धतीने सोडत काढून प्रवेश निश्‍चित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यामध्ये सन-2018-19 या शैक्षणिक वर्षा करिता आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दि. 10 फेबु्रवारी पासून सुरू आहे. या प्रक्रियेस दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. दाखल झालेल्या अर्जामध्ये क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी दि.12  सोमवार रोजी स्काऊट गाईड भवन, बीड येथे सकाळी 11 वाजता लॉटरी पद्धतीने सोडत केली जाणार आहे.

सदरील सोडत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा, शिक्षण सभापती, जिल्हा परिषदेेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पालकांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. या सोडतीवेळी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, संबंधीत विभागाचे काम पाहणारे विस्तार अधिकारी, एम. आय. एस. कोऑर्डीनेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर 25 टक्के प्रवेशीत शाळेंचे मुख्यध्यापक उपस्थित राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.