Mon, Apr 22, 2019 04:08होमपेज › Marathwada › परभणीला ४ दिवस पुरेल एवढेच पाणी

परभणीला ४ दिवस पुरेल एवढेच पाणी

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 10:27PMपरभणी : प्रदीप कांबळे

सूर्य आग ओकत असल्याने उन्हाचा पारा जिल्ह्यात 43 अंशांच्या वर सरकला आहे. पाणीपातळी वेगाने खाली जात असून, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यावर भर दिल्या जात आहे. परभणी शहरास पाणीपुरवठा करणार्‍या रहाटीच्या बंधार्‍यात येत्या 10 मेपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा उपलब्ध असून त्यानंतर प्रशासनाने पाणीपुरवठा वेळेत न उपलब्ध करून दिल्यास शहरातही भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या रहाटी बंधार्‍यात पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे वेळेत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा या दृष्टीने मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाण्याच्या मागणी करण्यात येत आहे. रहाटी बंधार्‍यात दहा तारखेपर्यंत पुरेल एवढे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शहरास दहा दिवसाला का होईना पाणी मिळणे शक्य झाले आहे. ज्या भागात पाईपलाईन नाही, अशा भागात मनपातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचार्‍यांमार्फत जागृती करण्यात येत आहे, परंतु शहरातील जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईची भीषणता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. घरा-घरात असणारे बोअर, हातपंप बंद पडले आहेत. शिवाय वीज वितरण कंपनीने भारनियमन अनिवार्य केल्यामुळे पाणी मिळवणे कठीण होऊन बसले आहे. अशातही नळाला चार ते पाच दिवसाने येणारे पाणी आता दहा ते बारा दिवसाने मिळत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकरग्रस्त भागातील नागरिकांना टँकर वेळेवर न आल्यास पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

आगामी काळात जर पाणीपुरवठा उपलब्ध नाही झाला तर शहरातही मोठी पाणीटंचाई निर्माण होईल. याकरिता लोअर दुधना प्रकल्पाचे पाणी वेळेत रहाटीच्या बंधार्‍यात सोडून शहराच्या पाण्याची गरज प्रशासकडून पूर्ण करण्यात येत आहे. मात्र  मे व जून महिन्यात पाणीटंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून स्वतंत्र उपाययोजनेची आवश्यकता असून, पाणीपुरवठ्यात नियोजन करून होत असलेला अपव्यय टाळल्यास  शहराला टंचाई जाणवणार नाही अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्‍त करीत आहेत. 

निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडणार

परभणी:  शहर महानगरपालिकेकरिता पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने राहटी कोल्हापुरी पध्दतीच्या बंधार्‍यात  9 मे रोजी पाणी पोहचेल, यादृष्टीने निम्न दुधना प्रकल्पातून 8 मे रोजी दुधना नदीपात्राद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावातील कोणत्याही व्यक्तीने किंवा शेतकर्‍यांनी नदीपात्रात जाऊ नये किंवा आपली जनावरे, पशु नदीपात्रात जाणार  नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच नदीपात्रात काही मालमत्ता असल्यास ती सुरक्षितस्थळी हलवावी. यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणत्याही गावकर्‍यांनी किंवा शेतकर्‍यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कारवाईची आवश्यकता

सद्यःस्थितीला पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असून, नळाला सोडण्यात आलेल्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची आवश्यक्‍ता आहे. नळाला सुटलेले पाणी बेसुमारपणे रस्त्यावर टाकून वाहने धुतल्या जात आहेत. घरांच्या छतावरही पाणी टाकून गारवा निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर देखरेख ठेवून  अपव्यय करणार्‍यांवर त्वरित दंडात्मक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे.