Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Marathwada › ‘नीट’ परीक्षेचे केंद्र सुरू करण्यासाठी धरणे

‘नीट’ परीक्षेचे केंद्र सुरू करण्यासाठी धरणे

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:33AMपरभणी ः प्रतिनिधी 

 मेडीकल प्रवेशासाठी देशपातळीवर घेेण्यात येणार्‍या नीट परीक्षेचे केंद्र परभणीत सुरू करावे या प्रमुख मागणीसाठी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणी जिल्हा कोचिंग क्‍लासेस असोसिएशनतर्फे विद्यार्थ्यांसोबत धरणे आंदोलन केले.  परभणी सोडून बाहेरगावच्या केंद्रात परीक्षा देण्यासाठी जावे लागत असल्याने एक दिवस अगोदरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र शहरात जावे लागते. तेव्हा तीन ते चार तासांचा प्रवास करून विद्यार्थी वेळेत जाऊ शकत नाहीत.

शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असताना देखील नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी मात्र विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागत आहे. परभणीत  जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी नीट परीक्षा देतात. मात्र परीक्षा केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा काळात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे शासनाने नीटचे परभणीत परीक्षा केंद्र सुरू करावे अशी मागणी यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी 
केली. यावेळी जिल्हा कोचिंग क्‍लासेस असोसिशन व विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना निवेदन दिले.

यावेळी अध्यक्ष दिलीप घुंबरे, डॉ. मारोती हुलसुरे, उपाध्यक्ष राजेश रणखांबे, सचिव विश्‍वंभर काठवटे, संघटक दिनकर गरूड, प्रा. गजानन काकडे, प्रा. बी. गुंडूराव, प्रा. अतिष परिहार, प्रा. संभाजी   सवंडकर, प्रा.आकाश टाकळकर, प्रा.विश्‍वनाथ फेगडे, डॉ.विजय मगर, प्रा.नितीन पारवे, प्रा.विष्णु नवपुते, प्रा.निती उंडाळकर, माधव जाधव, मिलिंद कानडे, प्रा.अरुण शेजावळे, प्रा.संतोष पोपडे, प्रा.कैलास सुळसुळे, प्रा.डव्हळे, प्रा.विठ्ठल खल्लाळ, अमित मुक्कावार, आमीर शेख, प्रा. प्रसाद संबरकर, प्रा.जितेंद्र देशमुख हे उपस्थित होते. 
 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा 

शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रियेसाठी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी   शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन प्रशासनास निवेदन दिले. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार शिंदे यांनी निवेदन घेऊन मागण्यांबाबत शासनास कळविण्याचे आश्‍वासन दिले. एम.पी.एस.सी. विद्यार्थी समन्वय समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यसेवा परीक्षेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील जागा 450 पेक्षा जास्त  वाढविण्यात यावी. संयुक्‍त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओची स्वतंत्र परीक्षा घेऊन 1500 पेक्षा जास्त जागांची जाहिरात काढावी. एमपीएससीने बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी, राज्यपातळीवरील रिक्‍त जागा तसेच 23435 हजार शिक्षकांच्या रिक्‍त जागा त्वरित भराव्यात. 

पोलिस भरतीच्या पदसंख्येत वाढ करून भरती प्रक्रियेत परभणीसह इतर 9 जिल्ह्यांचा समावेश करावा, राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी, परीक्षेसाठीची प्रवेश माफ करावी, एम.पी.एस.सी. ने तामिळनाडू पॅटर्न राबवावा, तलाठी पदासाठी जाहिरात काढून ती परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात यावी. सरळसेवेतील 30 टक्के कपात धोरण तत्काळ रद्द करून सर्व विभागांतील रिक्‍त जागा 100 टक्के भराव्यात, जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील जवळपास हजार ते बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी अर्पित भगूरकर, परमेश्‍वर नागरे, तानाजी भोळे यांच्यासह विद्यार्थी समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.