Sun, Apr 21, 2019 02:20होमपेज › Marathwada › पावसाळ्यात परभणी शहर तुंबणार

पावसाळ्यात परभणी शहर तुंबणार

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 9:13PMपरभणी : प्रतिनिघी

शहरात मोठा गाजावाजा करून स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करून रंगरंगोटीतून शहर स्वच्छता साध्य केली,  मात्र शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा सांडपाणी जात असणार्‍या नाल्यांमध्ये टाकण्यात येत असल्याने शहरातील मुख्य गटारे तुंडुंब भरली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आलेली गटार अवस्था दूर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर आला तरीही नालेसफाईच्या कामाला प्रशासनाने प्रारंभ केला नाही. त्यामुळे पावसाळ्यात शहर तुबण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील मोठ-मोठ्या गटारांच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अद्याप स्वच्छता मोहिमेस प्रारंभ न झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्वच्छतेच्या कामासाठी कर्तव्य पार पाडत असलेल्या  प्रभागनिहाय स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचार्‍यांची गटारवस्थेला दूर करण्यासाठी प्रशासनाने नियुक्‍ती केली  आहे, परंतु केरकचरा सफाई करून स्वच्छता मोहीम राबवित असल्याचा दिखाऊपणा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात पाणीकोंडीचा अनुभव वर्षानुवषार्र्ंचा असतानादेखील मनपा  स्वच्छता विभाग का विलंब लावत आहे. असा प्रश्‍न शहरवासीयांकडून उपस्थित केल्या जात आहे. डॉक्टर लाइन, बसस्टॅन्ड परिसरात असणारा मोठा डिग्गी नाला कचरा व गाळाने भरला असल्याने शहरातील लहान-लहान नाल्यांचे पाणी शहराबाहेर जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिवाय गल्‍लीबोळातील छोटी गटारेही गाळ व कचर्‍यांनी तुडुंब भरली आहेत. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

शहरात गटार स्वच्छतेची मोहीम राबवून पावसाळ्यापूर्वी गटारे साफ केल्या जातील, असे मनपा प्रशासनाने सांगितले असले, तरी शहरात मात्र कोणतीही मोहीम प्रारंभ झाली नसल्याची वास्तविकता पाहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित मोहीम सुरू करून गटार-नाले स्वच्छता करून पावसाळ्यातील संभाव्य समस्या टाळाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.