Wed, Jul 17, 2019 20:25होमपेज › Marathwada › माघार घेणारे नागरे अखेर रिंगणातच!

माघार घेणारे नागरे अखेर रिंगणातच!

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 9:27PMपरभणी : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी आलेल्या पाच उमेदवारांपैकी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून उर्वरित तिघांंनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश देशमुख, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया व अपक्ष उमेदवार सुरेश नागरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याचे चित्र 7 मे रोजी स्पष्ट झाले. अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासाठी पाच मिनिटांचा उशीर झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सुरेश नागरे यांना परवानगी दिली नाही. 

7 मे दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांनी सर्वप्रथम येऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यापाठोपाठ अपक्ष उमेदवार डॉ. प्रफुल्ल पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला; परंतु उर्वरित तीन उमेदवारांमध्ये दोघे प्रमुख पक्षाचे उमेदवार असून अपक्षानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी पुकारा करून कोणाला अर्ज मागे घ्यायचा आहे का? अशा सूचना दिल्या होत्या. 

सुरेश नागरे  तेथे अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले खरे मात्र त्यांना पाच मिनिटांचा उशीर झाल्याने माघारीचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. प्रमुख पक्षाचे दोनच उमेदवार निवडणूक लढवणार व इतर तिघे माघार घेणार, अशी चर्चा सोमवारी सकाळपासूनच सुरू होती. विशेषतः अपक्ष उमेदवार सुरेश नागरे उमेदवारी अर्ज मागे घेतील शक्यता वर्तवण्यात येत होती; परंतु सुरेश नागरे यांनी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांची उमेदवारी निश्‍चित झाली. 

दरम्यान शिवसेना-काँग्रेस अशी सरळ लढत होणार असल्याचे संकेत असतानाच भाजपचे नेते असलेले अपक्ष उमेदवार यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्रही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तीन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे असून खर्‍या अर्थाने आता विधान परिषदेच्या आमदारीकीसाठी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होईल.