होमपेज › Marathwada › देशमुख की बाजोरिया, पैजावर पैजा

देशमुख की बाजोरिया, पैजावर पैजा

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:34PMहिंगोली : प्रतिनिधी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापासूनच युती व आघाडीच्या समर्थकांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला आहे. विजयाचा दावा करण्याबरोबरच निवडणूक निकालावर हौशी कार्यकर्त्यांनी लाखोंच्या पैजा लावल्या आहेत. आघाडीच्या उमेदवाराकडून उशिरापर्यंत रसद पुरवठा झाला नसल्याने नाराज झालेल्या काही मतदारांनी आघाडीचा धर्म सोडून उमेदवाराला हात दाखविल्याची चर्चा सुरू असल्याने निकालात चमत्कार होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे विप्लव बाजोरिया व काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात सरळ लढत झाली. तर अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी माघार घेत शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याने रविवारी रात्री निवडणुकीचे गणित बदलल्याचे बोलले जात आहे. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मागील महिन्याभरापासून मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातून ऐन वेळी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे विदर्भातून आलेले विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून समोर करण्यात आल्याने नाराजीचा सूर होता. 

उद्योगपतीचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने लक्ष्मीदर्शनाची आस मतदारांना लागली होती. जवळपास पाचशे मतदार असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीपासून मोठी चुरस पाहावयास मिळाली. आघाडीचे सुरेश देशमुख यांचे पारडे सुरवातीला जड असल्याचे बोलले जात होते.

राष्ट्रवादी व काँग्रेसचे मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे बाजोरिया यांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात होती. परंतु आघाडीचे सुरेश देशमुख यांनी मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत मतदारांना खिळवत ठेवल्याने अनेकांचा भ्रमनिराश झाला. शिवसेनेचे बाजोरिया यांनी आपल्या समर्थकांमार्फत रविवारी रात्री आघाडीतील काठावरील व नाराज मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला त्यांना काहीअंशी यश आल्याने त्यांनी सोमवारी सकाळी गाठीभेटी वाढवत मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आघाडीच्या उमेदवाराकडून मतदारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या सोयीनुसार मतदारांचा कल ओळखून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. हिंगोलीच्या मतदान केंद्रासमोर केवळ शिवसेनेचा टेंट होता. तसेच सेनेचे प्रमुख पदाधिकारीही मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मात्र आपल्या बैठकीत मतदारांचे मन वळविण्यात मग्‍न असल्याने मधल्या काळात बाजोरियाच्या समर्थकांनी आघाडीच्या मतदारांशी संधान साधल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.