परभणी : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 21 मे रोजी मतदान झाल्यानंतर सर्व मतदान पेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. 24 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार असून, त्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. मतमोजणी केंद्रावर चोख बंदोबस्तही लावण्यात आला आहे. मतमोजणीसाठी 2 टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून, 25 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
21 मे रोजी 7 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. याकरिता 99.60 टक्के इतके मतदान झालेले आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मुख्य संचालिका केरकट्टा या काम पाहत आहेत.
मतमोजणी कक्षाची अधिकार्यांकडून पाहणी
सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर संध्याकाळी उशिरा सातही मतदान केंद्रांवरील मतपेट्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्या. त्या ठिकाणी तयार केलेल्या स्ट्राँग रूममध्ये या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या असून, तेथे चोख बंदोबस्त लावला आहे. 24 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी बी. एच. बिबे यांनी मतदान कक्षाची पाहणी करून तयारीसंदर्भात सूचना केल्या आहेत. त्या ठिकाणी मीडिया सेल, कॉम्प्युटर सेल तयार करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली. दरम्यान अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले सुरेश नागरे यांनी बाजोरिया यांना पाठिंबा दिल्याने शेवटच्या टप्प्यात निकालाचे गणित बदलल्याचे दिसले, तरीही नेमका निकाल काय लागतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. त्यामुळे गुरुवारी होणार्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणाला किती मते मिळतात आणि कोण जिंकतो याचा निकाल गुरुवारीच होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सकाळी 10.30 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.