Thu, Apr 18, 2019 16:35होमपेज › Marathwada › हल्‍लाबोल करणार्‍यांनी विचार करून बोलावे : पंकजा मुंडे

हल्‍लाबोल करणार्‍यांनी विचार करून बोलावे : पंकजा मुंडे

Published On: Jan 22 2018 7:50AM | Last Updated: Jan 22 2018 7:50AMबीड : प्रतिनिधी

ज्यांनी गायरान जमिनीवर संस्था उभारल्या, गरिबांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांनी आपण काय बोलतो याचा विचार करावा. भाषण करताना आपण काय केले याचा विचार हल्‍लाबोल करणार्‍यांनी करावा, असा टोला ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.जिल्हा नियोजन समितीची रविवारी जिल्हाधिकारी  कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, सर्वाधिक 10 हजार कोटी रुपयांचा विकास निधी जिल्ह्यासाठी आणला. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेचे काम वेगात सुरू असून, 2019 पर्यंत याला मूर्त स्वरूप येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राज्यातील एकाच म्हणजे बीड रेल्वेसाठी मोठा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रा आणि विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना मुंडे म्हणाल्या की, ज्यांनी गरिबांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांना काय बोलतो याचा विचार करावा. मी हल्लाबोल केला तर खरेच बोलू असेही मुंडे म्हणाल्या.

नियोजन समितीत अभिनंदन

बीड जिल्हयातील नारायण गड, गहिनीनाथ गड तीर्थक्षेत्र विकासाचा 25 कोटींचा आराखडा मंजूर केल्याबद्दल तसेच रस्ते व राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनाथ बालकांना एक टक्के आरक्षण दिल्याबद्दल नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी पंकजा मुंडे यांची अभिनंदन केले. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 2018-19 या आर्थिक वर्षाचा 315 कोटी 36 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास यावेळी मंजूरी दिली. बैठकीत ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, कृषी, बांधकाम, ग्रामीण पेयजल, आरोग्य आदी विभागाचा आढावा घेण्यात आला.