Sun, Sep 22, 2019 22:12होमपेज › Marathwada › 'थॅक्यू बाबा म्हणत' पंकजा आणि प्रीतम समाधीवर नतमस्तक

'थॅक्यू बाबा म्हणत' पंकजा आणि प्रीतम समाधीवर नतमस्तक

Published On: May 23 2019 10:55PM | Last Updated: May 23 2019 10:55PM
परळी : प्रतिनिधी

'थॅक्यू, बाबा' म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आज (ता.२३) सायंकाळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक होत लोकसभा निवडणुकीचा विजय त्यांना समर्पित केला. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी बीडकडे जाताना रस्त्यात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पंकजा व प्रीतम मुंडे यांचे जंगी स्वागत केले. तर मुंडे यांच्या अभूतपूर्व विजयाबद्दल जिल्ह्यात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी विक्रमी मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय मिळवला. सायंकाळी विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी डाॅ प्रीतम पंकजा यांच्यासह बीडकडे रवाना झाल्या. बीडला जाण्यापूर्वी त्यांनी डॉ. अमित पालवे, गौरव खाडे यांच्यासह परळीत प्रभू वैद्यनाथाचे तसेच दक्षिणमुखी गणपतीचे दर्शन घेतले. 

गोपीनाथ गडावर नतमस्तक

पंकजा व प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'थॅक्यू, बाबा' म्हणत त्यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांना समर्पित केला व त्यांचे आभार मानले. 'संडे टू मंडे, गोपीनाथ मुंडे,' 'मुंडे साहेब अमर रहे' च्या घोषणांनी गडाचा परिसर दणाणून गेला. 

गुलालांची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी

पंकजा व प्रीतम मुंडे यांच्या वाहनांचा ताफा बीडकडे जाताना रस्त्यात ठिकठिकाणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी जेसीबी मशिनने  गुलाल उधळला. जिल्हयात यानिमित्ताने अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली.