Thu, Aug 22, 2019 04:04होमपेज › Marathwada › पंढरपूर, पुणे पॅसेंजर पुन्हा दोन महिने रद्द

पंढरपूर, पुणे पॅसेंजर पुन्हा दोन महिने रद्द

Published On: Aug 06 2018 2:02AM | Last Updated: Aug 06 2018 2:01AMपूर्णा : सतीश टाकळकर  

पंढरपूर व  पुण्याला जाणार्‍या पॅसेंजर  रेल्वेगाड्या 3 ऑगस्टपासून पुन्हा दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या असून दौंडला जाणारी पॅसेंजर कोपरगाव स्थानकापर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सोलापूर विभाग मध्य रेल्वेमध्ये वांबोरी आणि राहुरी स्थानकांदरम्यान हाती घेतलेल्या  ट्रॅफिक ब्लॉकमुळे आणि रेल्वेपटरी दुरुस्ती कामाचे कारण दाखवून निजामाबाद-पंढरपूर, निजामाबाद-पुणे या रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. तर नांदेड-दौंड ही गाडी कोपरगावपर्यंतच धावत होती. पंधरा दिवसांपूर्वी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार्‍या भक्तांना पंढरपूर यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने 15 दिवसांसाठी का होईना या गाड्या सुरू केल्या, परंतु पंढरपूर यात्रा संपताच अजून दोन महिने सदरील कामाचे कारण पुढे करून तब्बल पुढील 2 महिन्यांसाठी त्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दौंड गाडीला कोपरगाव स्थानकापर्यंतच सोडण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांना जादा भाडे देऊन पंढरपूर, पुणे प्रवास करावा लागत आहे. श्रावण महिन्यात पंढरपूर व पुण्याकडे जाणार्‍या भाविक भक्तांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.  

श्रावण महिन्यात भाविकांची होणार गैरसोय  

मराठवाड्यातील गोरगरीब प्रवाशांना पंढरपूर व पुण्याला जाण्यासाठी परवडणारे प्रवासभाडे असल्याने या गाड्यांना प्रवासासाठी अधिक पसंती आहे. परिवहन मंडळ अथवा खासगी बसने पंढरपूर व पुण्याला जाण्यासाठी रेल्वे तिकीट दरापेक्षा तीन ते चार पट खर्च करावा लागत असल्याने या मार्गावर धावणार्‍या तीनही रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. श्रावण महिना लागत असल्याने रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरळीत गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.

दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या हिताकडे रेल्वेचे दुर्लक्ष

महाराष्ट्रात आंदोलन व बंदमुळे महामंडळासह खासगी गाड्यांवर याचा परिणाम झाला असताना रेल्वे प्रशासनानेही पंढरपूरला जाणारी एकमेव पॅसेंजर गाडी बंद केली आहे. यामुळे श्रावण महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी गैरसोयीत मोठी भर पडणार आहे. दर महिन्याला तेथे अनेकांची वारी असते. कुटुंबासह तेथे दर्शनासाठी जातात आणि भंडारा करतात त्यांनाही त्रास होणार आहे. यामुळे या भागातून जाणार्‍या भाविक भक्तांना याचा त्रास होणार असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.  - सुभाषचंद्र ओझा, रेल्वे प्रवासी.