Wed, Jul 08, 2020 19:35होमपेज › Marathwada › पीएम नरेंद्र मोदींची परळीत प्रथमच सभा; परळीला छावणीचे स्वरुप

पीएम नरेंद्र मोदींची परळीत प्रथमच सभा; परळीला छावणीचे स्वरुप

Last Updated: Oct 16 2019 6:53PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१७) सकाळी परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयच्या समोरील  मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपकडून सुरू आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या

  जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या परळीत मोदींची प्रथमच सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी पूर्ण झाली असून सुरक्षा व्यवस्था आणि न भुतो न भविष्यति असा बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला आहे. यामुळे परळीला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी  (दि  १७ ऑक्टोबर) रोजी परळीत जाहीर सभा होणार आहे. सकाळी ११ वा. वैद्यनाथ महाविद्यालया समोरील २७ एकराच्या  मैदानात नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेला महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार तसेच राज्यातील भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमानानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने मोठी तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलिसांचा मोठा ताफा, वायुसेना, स्थलसेना यांची हेलिकॉप्टर तपासणी उपकरणे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, रूग्णवाहिका, वैद्यकीय पथक अशी सर्व सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. 

एकीकडे प्रशासन पंतप्रधान मोदी यांच्या सभेची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष देखील युद्धपातळीवर मोदींच्या सभेची तयारी करीत आहे. या ठिकाणी ५० बाय ४०  चे मुख्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. वॉटर प्रुफ  सभामंडपाची उभारणी करण्यात आली  आहे. तसेच सभेच्या ठिकाणी 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करण्यात आली असून महिला, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, अतिविशिष्ट, विशिष्ट,  निमंत्रित, पत्रकार, असे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. 

पोलिस यंत्रणेने श्वान, बॉम्बशोधक पथकामार्फत सभास्थळ व परिसराची तपासणी केली. बंदोबस्तासाठी बाहेरून मोठा पोलिस  बंदोबस्त मागवण्यात आला आहे. पोलिस अधिकारी, हजारो  पोलिस कर्मचारी, एसआर पीएफ, मोबाईल जॉमर, वाहन आदी व्यवस्था लावण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात वेगळा बंदोबस्त राहणार आहे.

परळीकडे येणाऱ्या विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था वळवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर परळीत विविध मार्गाने  येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. सभेसाठी येणारी गर्दी लक्षात घेता परळी शहराकडे येणारी वाहतूक सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत बंद करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड, नांदेडकडे जाणारी वाहतुक तेलगावहुन माजलगाव पाथरीकडे तर अंबाजोगाईहून गंगाखेड, नांदेडकडे  जाणारी वाहतूक पिंपळा धायगुडा येथुन पुस मार्गे परळी जवळील धर्मापुरी फाटा येथून गंगाखेडकडे वळवण्यात आली आहे. सभेसाठी येणार्या वाहनांसाठी परळी बाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी जाण्यासाठी बसेसची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. सिरसाळा, बीड, माजलगावकडून येणाऱ्या वाहनासाठी नागनाथअप्पा हालगे इंजिनिअरिंग कॉलेज येथे पार्किंग करुन सभास्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अंबाजोगाईकडून येणाऱ्या वाहनासाठी हॉटेल सपना जवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर परळीत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान

वीस वर्षापूर्वी लोकनेते मुंडे साहेबांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी तत्कालीन दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी परळीत आले होते. त्यानंतर इथे येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.

मोदींचे आगमन ठरणार बीड जिल्हयाच्या विकासाची नांदी : पंकजा मुंडे

मोदी प्रचारासाठी येत असले तरी हा केवळ प्रचार नाही तर त्यांचे आगमन हे परळीसह बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरणार आहे. माझ्या दृष्टीने ही सभा प्रचाराच्या पलिकडची आहे. मोदी हे जागतिक स्तरावरील नेते आहेत. त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी देशाला प्रगतीकडे घेऊन जात आहे. त्यांच्या आगमनाने आमचा प्रचार तर होणारच आहे पण, भविष्यातील जिल्ह्याच्या विकासाची पहाट इथून होणार आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.