Wed, Jul 08, 2020 01:22होमपेज › Marathwada › महिला फौजदाराचा अपघात नव्हे घातच, पित्‍याचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महिला फौजदाराचा अपघात नव्हे घातच, पित्‍याचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Published On: Jun 12 2019 8:56PM | Last Updated: Jun 12 2019 8:56PM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

माझ्या मुलीचा अपघात नसून घात झाला आहे. ती चौथ्या मजल्यावरुन पडली नसून तिला चौघांनी ढकलून दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी व यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला फौजदाराच्या पित्याने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. संबंधित महिला फौजदारावर सोलापुरात उपचार सुरु आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, 31 मे रोजी संबंधित महिला फौजदार राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सुरुवातीला उस्मानाबाद शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापूरला हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला फौजदाराचे कुटुंबिय भेटण्यासाठी आले असता, महिला फौजदाराने शुध्दीवर आल्यानंतर हाताने इशारा करुन चौघांनी ढकलून दिल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पित्याने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिली आहे. 

माझ्या मुलीची पहिली नियुक्‍ती असलेल्या पोलिस ठाण्यात तेथील पोलिस निरीक्षकाने मानसिक व लैंगिक छळ केला. याची माहिती मुलीने गुढी पाडव्याला गावी आल्यानंतर आम्हाला सांगितली होती. त्यानंतर तिने स्टेशन डायरीला तशी नोंदही केली होती. याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी पोलिस अधीक्षकांनी सुरु केली, मात्र तिची बदली शहरातील दुसर्‍या ठाण्यात करण्यात आली. तिला ढकलून देणार्‍यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.