होमपेज › Marathwada › बनावट एटीएमद्वारे पैसे लुबाडणारी टोळी जेरबंद

बनावट एटीएमद्वारे पैसे लुबाडणारी टोळी जेरबंद

Published On: Apr 30 2018 7:49PM | Last Updated: Apr 30 2018 7:49PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

रांगेत थांबलेल्या बँक ग्राहकांच्या एटीएमचे तपशील चोरून व त्याआधारे बनावट एटीएमद्वारे पैसे लुबाडणारी आंतरराष्ट्रीय टोळी उस्मानाबाद पोलिसांनी जेरबंद केली. आठ दिवसांपूर्वी यातील एका आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरीत चौघांना चंद्रपूर तसेच अमरावती कारागृहातून ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी त्यांनी सांगितले, की 18 नोव्हेंबर 2017 रोजी सौदागर लिंबाजी माळी (वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण, उस्मानाबाद) हे पैसे काढण्यासाठी एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. त्या वेळी रांगेत त्यांच्या मागे असलेल्या परितोष तारापद पोद्दार याने खुबीने माळी यांच्या कार्डवरील नंबर, पिन नंबर मिळविले. त्याते तेथूनच ते तातडीने मेसेजद्वारे त्याच्या साथीदारांना कळविले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी बनावट एटीएमकार्ड तयार करून माळी यांच्या खात्यातील 1 लाख 60 हजारांची रक्‍कम लंपास केली.

त्यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. यातील पोद्दार (रा. ओरिसा) याला गेल्या आठवड्यातच अमरावती येथून अटक केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर या कामात त्याला मदत केलेल्या साथीदारांची नावे त्यांनी सांगितले. त्यातील विशाल तुळशीराम उमरे (रा. वरोरा, जि. चंद्रपूर), हरिदास हरिविलास बिश्‍वास (रा. मलकानगिरी, ओरिसा), जितेंद्रकुमार अनिलकुमार सिंह (रा. नोनी, जि. गया, बिहार), किशन लालचंद यादव (रा. नवी दिल्‍ली) हे चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात होते. या सर्वांचे ट्रान्सफर वॉरंट घेऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाला असून, सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत झाली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. एम. शेख, सहायक निरीक्षक वीर्यानी कदम यांनी विशेष मेहनत घेतली. या आरोपींनी अशी अनेक प्रकरणे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.