Sun, May 26, 2019 11:02होमपेज › Marathwada › उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली

Published On: May 23 2018 8:22PM | Last Updated: May 23 2018 8:22PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची विधानपरिषद निवडणुकीची गुरुवारी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात सुरु असलेल्या खटल्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रचंड चुरशीचा झालेल्या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याची उत्कंठा शिगेला पोहचली असताना, हा निर्णय आल्याने कार्यकर्त्यांत उत्सुकता शिगेला लागली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे या दोघांनीही आपणच विजयी होऊ, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. 

स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धस आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे पुरस्कृत जगदाळे यांच्यात दुरंगी लढत झाली. दोन्ही पक्षांचे मतदारसंघात प्राबल्य असल्याने मतदारांनी कोणाला कौल दिला, तर उमेदवार न दिलेल्या शिवसेनेची मते कोणाच्या झोळीत पडली, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच एकमेकांवर कुरघोडी करणार्‍या भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य धनंजय मुंडे यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील कौल आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे. निकालास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असताना ही मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मतमोजणी कधी? अनिश्‍चितता कायम

मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी पत्र पाठवून मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार नसल्याचे कळविले आहे, असे अधिकारी वर्गाने सांगितले. स्थानिक पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली होती. विशेष म्हणजे, या जागेची मतमोजणी आता नेमकी केव्हा होणार याबाबत या पत्रात काहीही माहिती देण्यात आली नव्हती.