Fri, Mar 22, 2019 08:21होमपेज › Marathwada › शेतकरी भवनाला नगरसेविकेचा विरोध

शेतकरी भवनाला नगरसेविकेचा विरोध

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:25AMहिंगोली : प्रतिनिधी

पालिकेने वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत आठवडी बाजारात शेतकरी भवन बांधण्याचा ठराव सोमवारी पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या शेतकरी भवनाला काँग्रेसच्या नगरसेविकास अर्चना भिसे यांनी सभेत विरोध दर्शविला होता, परंतु हा ठराव सत्ताधार्‍यांनी मंजूर केल्यामुळे शेतकरी भवनावरून पालिकेत वाद उभा राहिला आहे. आठवडी बाजारात शेतकरी भवन उभारून पालिका काय साध्य करणार, असा प्रश्‍नही नगरसेविकेने उपस्थित केला आहे.

हिंगोली पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्राप्‍त झालेल्या निधीमधून आठवडी बाजारात शेतकरी भवन बांधण्याचा ठराव चर्चेअंती मंजूर करण्यात आला. चर्चेपूर्वीच काँग्रेसच्या नगरसेविका अर्चना भिसे यांनी विरोध दर्शविला होता, परंतु नगरसेवकांनी या विषयाला मंजुरी दिल्यामुळे हा ठराव पारीत करण्यात आल्याने पुन्हा मंगळवारी पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन या कामाला विरोध दर्शविला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन बांधणे गरजेचे आहे. कारण शेतकर्‍यांची वर्दळ असते. बाजार समितीपासून मंगळवारा बाजार खूप अंतरावर आहे. त्यामुळे या भवनाचा शेतकर्‍यांना फायदा होणार नाही. ज्यासाठी शेतकरी भवन बांधावयाचे आहे तो उद्देश साध्य होणार नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच यापूर्वी शहराबाहेर क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे, परंतु या क्रीडा संकुलाचा फायदा खेळाडूंना होत नसल्याचे दिसून येत आहे. तीच गत शेतकरी भवनाची        होणार असून केवळ शोभेची वस्तू होण्याची भीती त्यांनी व्यक्‍त केल्यामुळे शेतकरी भवन बाजार समितीच्या आवारात बांधण्यात यावे अशी मागणीही नगरसेविका अर्चना भिसे यांनी केली आहे.