Sat, Apr 20, 2019 08:33होमपेज › Marathwada › वंचित कर्जदार शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास मिळणार संधी

वंचित कर्जदार शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास मिळणार संधी

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:33AMजालना : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकर्‍यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही यापूर्वी अर्ज केलेला नाही, अशा अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये एकूण 2 लाख 14 हजार 750 कुटुंबांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी केलेली होती. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत एकूण 1 लाख 57 हजार 868 पात्र लाभार्थी शेतकर्‍यांचे 956 कोटी 42 लाख 9 हजार इतकी यादी व रक्कम जिल्ह्यातील 20 बँकेच्या एकूण 162 शाखांना प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 1 लाख 23 हजार 854 शेतकर्‍यांना 593 कोटी 91 लाख 6 हजार इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकर्‍यांच्या  खात्यावर देण्यात आलेला आहे. 

या योजनेत अर्ज भरण्यास वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी अर्ज करण्याचा कालावधी 31 मार्चपर्यंत आहे. यापूर्वी या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. अर्ज भरण्यापासून वंचित शेतकर्‍यांना ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत किंवा स्वत : ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येतील. 

शेतकर्‍यांसाठी स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्जाद्वारे माहिती भरून ऑनलाइन अर्ज भरण्याची सेवा निःशुल्क आहे. योजनेत अर्ज भरण्यापासून वंचित शेतकर्‍यांनी आपले अर्ज ऑनलाइन भरावेत, असे आवाहन  जिल्हाधिकारी  शिवाजी जोंधळे,  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एन व्ही आघाव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.