Tue, Mar 19, 2019 03:29होमपेज › Marathwada › दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीची ऑनलाइन नोंद

दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीची ऑनलाइन नोंद

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 9:10PMपरभणी : प्रतिनिधी

दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीला नियंत्रणात ठेवण्याकरिता शहर महानगरपालिकेतही दांडीबहाद्दरांवर अंकुश ठेवण्याकरिता 7 मेपासून बायोमेट्रिक मशीनद्वारे इनेबल अटेंडन्स प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती घेेणे सुरू  केले आहे. टप्प्या-टप्प्याने मनपाच्या प्रत्येक विभागात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आली असून, सद्यःस्थितीला 21 ठिकाणी ही प्रणाली सुरू असून एका ठिकाणचे काम प्रगतिपथावर आहे.  

मनपाच्या एकूण 770 अधिकारी -कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक मशीनद्वारे इनेबल अटेंडन्स प्रणालीत नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयासह आरोग्य विभागाचे रुग्णालय, कल्याण मंडपम, राजगोपालाचारी उद्यान, प्रभाग समिती कार्यालय, प्रभाग समिती ब, प्रभाग समिती अ, विद्यानगर येथील पाण्याची टाकी, मौ.अबुल कलाम सार्वजनिक वाचनालय, ममता कॉलनी येथील पाण्याची टाकी, क्रांती चौक येथील कार्यालय, चष्मेहयात विहीर, नटराज रंग मंदिर येथील स्वच्छता विभागाचे कार्यालय, पाण्याची टाकी खंडोबा बाजार, ख्वाजा कॉलनी येथील पाण्याची टाकी, जलशुध्दीकरण केंद्र, खानापूर येथील मनपा रुग्णालय, खंडोबा बाजार येथील मनपा रुग्णालय, रमाबाई आंबेडकरनगर येथील मनपा रुग्णालय, शंकरनगरातील मनपाचे आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आली आहे. यापूर्वी मनपाचे मुख्य कार्यालय वगळता इतर ठिकाणची उपस्थिती ही रजिस्टरद्वारे होत असे, परंतु ही प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे सर्व विभागांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. 29 मे रोजी 770 पैकी 642 कर्मचार्‍यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यात आली होती.

ही उपस्थिती या प्रणालीनुसार घेण्यात येत असल्याने कोणत्याही अधिकारी कर्मचार्‍यास कार्यालयीन वेळ चुकवून उपस्थित राहता येणार नाही. कार्यालयीन वेळेत उपस्थिती दर्शविणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वेळेच्या नियमान्वये गैरहजेरी धरण्यात येत असल्याने दांडीबहादर कर्मचार्‍यांना मात्र या प्रणालीने चांगलेच अडचणीत आणले आहे. गैरहजेरी टाळण्यासाठी कर्मचारी मशीनवर वेळेत थम्ब करत आहेत.