Tue, Nov 13, 2018 01:30होमपेज › Marathwada › विंधन विहिरीसाठी खासगी मशीनवर मदार 

विंधन विहिरीसाठी खासगी मशीनवर मदार 

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:50PMपरभणी : नरहरी चौधरी 

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामीण भागातील चौकाचौकांत व रहदारीच्या ठिकाणी मंजुरी देत विंधन विहिरी घेतल्या जातात. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळतो; पण या विंधन विहिरी घेण्याकरिता कार्यरत असलेली एक मशिनरी खराब झाल्याने तिच्या दुरुस्तीऐवजी तब्बल नऊ जणांना टेंडरद्वारे मान्यता देत त्यांच्याकडील खाजगी मशीनवर संपूर्ण मदार आहे. 

ग्रामीण भागात विंधन विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ते काम पूर्ण करण्याकरिता जिल्हास्तरावरून बोअर पाडण्याची मशिनरी पाठवली जाते. 2013 पर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडील यांत्रिकी विभागाला एक मशिनरी उपलब्ध करून दिलेली होती; पण त्या मशिनरीची सध्या दुरवस्था झाल्याने ती जिल्हा कृषी कार्यालयालगतच्या परिसरात हातपंपाचे साहित्य ज्या ठिकाणी ठेवले आहे त्यालगत धूळखात पडली आहे. या कालावधीपर्यंत शासकीय मशिनरीद्वारे विंधन विहिरींची कामे पूर्ण झाली. ही मशिनरी दुरुस्तीअभावी दुर्लक्षामुळे धूळखात पडल्याने सध्या ग्रामीण पातळीवर ई-निविदा काढून मशिनरीची उपलब्धता करत मागील चार ते पाच वर्षांपासून विंधन विहिरींची कामे केली जात आहेत. यामुळे सरकारी मशिनरी सध्या यांत्रिकी विभागाकडे चालू अवस्थेत कार्यरत नसल्याने खाजगी मशिनरीवरच मदार आहे. यात एक रिबोअर, एक बोअरची मशिनरी व त्यांच्यासमवेतची इतर वाहने बंद अवस्थेत आहेत.