Sun, Mar 24, 2019 12:55होमपेज › Marathwada › आठव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम

आठव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 11:59PMबीड : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. परळी येथे ठिय्या आंदोलन सुरूच असून बुधवारी काही नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली.  गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कल्याण विशाखापट्टम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परळी येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलकांची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन आंदोलनात सहभाग घेतला.

 जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र वातावण शांत असून व्यवहार सुरळीत सुरू होते. परळी येथे सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा देण्यासाठी समाजबांधव विविध ठिकाणहून दाखल झाले होते. दिवसभरात विविध संस्था, संघटना यांच्या  पदाधिकार्‍यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.  

काँग्रेस नेते भाई जगताप, अब्दुल सत्तार, काँग्रेस चे नेते प्रा. टी. पी. मुंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला. वडवणी तालुक्यातही ठिकठिकाणी आंदोलन झाले. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी ही व्यापारी व ग्रामस्थानी आपले व्यवहार व दुकाने बंद ठेवले होते. बँक, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.  कोळगाव येथून गेलेला राष्ट्रीय महामार्ग 222 हा ग्रामस्थांनी तब्बल तीन तास अडवून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या दोन्हीही बाजुने लांबच-लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तहसीलदार संजय पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते, दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, सपोनि शिवाजी गुर्मे यांनी स्वतः उपस्थित राहून चोख पोलिस बंदोबस्त बजावला.