Thu, Jun 20, 2019 06:43होमपेज › Marathwada › चौदाव्या दिवशीही पथदिवे बंदच

चौदाव्या दिवशीही पथदिवे बंदच

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 11:51PMहिंगोली : प्रतिनिधी

आपल्या कार्यकर्तृत्वामुळे हिंगोली पालिका मराठवाड्यात अव्वल असली तरी मागील चौदा दिवसांपासून पालिका व महावितरण अधिकार्‍याच्या ताठर भूमिकेमुळे शहरातील पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ अंधाराच्या खाईत लोटल्या गेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही विभागांचे अधिकारी प्रयत्नशील असले तरी पुढारी मात्र या गंभीर विषयाकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

हिंगोली नगर पालिकेकडे  वीज वितरण कंपनीचे 2003 पासूनची तब्बल 6 कोटींच्या आसपास थकबाकी आहे. मुद्दल अडीच कोटी थकबाकी असली तरी त्यास दंड व त्यावरील व्याज मिळून हा आकडा सहा कोटींवर गेल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मागील वर्षभरापासून पथदिव्यांचे वीज देयक नियमित भरून महावितरणला सहकार्याचे धोरण अवलंबिले; परंतु मागील दोन महिन्यांपासून महावितरणच्या अधिकार्‍यांकडून मात्र थकीत देयकापोटी वारंवार शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.

हे प्रकरण थेट वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनातही गेले; परंतु त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. फेबु्रवारी महिन्यात काही दिवसांत पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्या वेळेस पालिकने 25 लाखांचा भरणा करून पथदिवे पूर्ववत सुरू केले होते. परंतु पुन्हा 27 मार्चपासून थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणाच्या वतीने शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने मागील चौदा दिवसांपासून हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ अंधाराच्या खाईत लोटल्या गेली आहे. बाजारपेठेत अंधार पसरल्यामुळे लहानसहान चोर्‍यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. नागरिकांमधून वारंवार पालिकेसह महावितरणकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा 
लागत आहे. 

Tags : Marathwada, 14th, day, street, light, closed