Thu, Jul 18, 2019 00:56होमपेज › Marathwada › गुरुवारी नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्यात

गुरुवारी नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्यात

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:48PMबीड : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील विविध भागातून जाणार्‍या व 4 हजार 587 कोटी 54 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या 729 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी 19 एप्रिलला होणार आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,  जहाज बांधणी आणि गंगा व जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून मोठा निधी महाराष्ट्र राज्याच्या रस्त्यांसाठी मिळाला आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्यांनी आरंभला असून येत्या गुरुवारी परभणी, नांदेड व बीड जिल्ह्यात ते दौर्‍यावर येत आहेत. बीड जिल्ह्यात 729 किमी लांबीच्या व 6 हजार 42  कोटी रुपये मंजूर कामांपैकी 4 हजार 587 कोटी 54 लाख रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचा लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ होणार आहे.

मुख्य सोहळा वाघाळ्यात

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला महामार्गाच्या माध्यमातून जोडण्याचे मोठे काम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कोनशिला अनावरण समारंभ होणार आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता परळी मतदारसंघात अंबाजोगाई साखर कारखाना परिसरात वाघाळा ता. अंबाजोगाई येथे हा मुख्य सोहळा होईल. ग्राम विकास व महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने समारंभाच्या संयोजक असणार आहेत. 

Tags : On Thursday, Nitin Gadkari, Chief Minister Fadnavis, district, Beed news