परळी वैजनाथ : प्रतिनिधी
परळी तालुक्यातील तडोळी येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार दि.१३) पहाटेच्या सुमारास घडली आहे. हरिनाम सप्ताहात सोने चोरल्याचा आरोप जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.
लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोनपेठ तालुक्यात गंगापिंप्री येथे दत्त जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले होते़ या सप्ताहामध्ये लिंबाजी बापूराव सातभाई याला सात दिवसांसाठी विणेकरी म्हणून बोलावले होते. तसेच सातभाई यांची वैजनाथ रोडे यांच्या घरी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती़. ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता रोडे यांच्या घरावरील सज्जामध्ये ठेवलेल्या १५ ते २० ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा आहे़, असे म्हणून ग्रंथाच्या पाठीमागे ठेवलेली पाच तोळे सोन्याची दागिन्याची पिशवी चोरून नेली़, अशी तक्रारी वैजनाथ रोडे यांनी सोनपेठ पोलिसांकडे दिली. त्यावरुन ११ डिसेंबर रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात लिंबाजी सातभाई याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सप्ताह संपल्यानंतर सातभाई त्यांच्या गावी परतल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजले. त्यामुळे व्यथित होऊन आज पहाटे तडोळी येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.