Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Marathwada › राज्यस्तरीय पथकाकडून पोषण आहाराची तपासणी

राज्यस्तरीय पथकाकडून पोषण आहाराची तपासणी

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:30AMजालना : प्रतिनिधी

शालेय पोषण आहार तपासणी पथकाच्या दोन दिवसांच्या आढावा दौर्‍यात जिल्ह्यातील चार शाळांची तपासणी केली, तर अंबड पंचायत समितीला भेट दिली. या पथकाने शालेय पोषण आहारासह शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्याच्या सिस्टिमचा आढावा घेण्यासाठी 6 ते 7 एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय समिती जिल्ह्याच्या दौर्‍यावर आली होती. खिचडी शिजवण्याची प्रक्रिया तपासण्यासाठी पथक येणार, अशा अविर्भावात सर्व गुरुजी मंडळी होते. समितीने शैक्षणिक मूल्यमापन, परिसर स्वच्छता, स्वच्छतागृह, धान्य याचीही अचानक तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी करून विद्यार्थ्यांकडून लेखन व वाचन करून घेतले. त्यात अंबड तालुक्यातील शहगड, जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव, बदनापूर तालुक्यातील मानदेऊळगाव, भोकरदन तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन तपासणी केली. यात समितीने समाधान व्यक्‍त केले.

अंबड पंचायत समिती कार्यालयास भेट दिली. यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रत्येक तालुक्याचे अधीक्षक उपस्थित होते. पथकासमोर अधीक्षकांनी समस्यांचा पाढा वाचला. पोषण आहाराच्या मदतनीस यांच्या मानधनाचा प्रश्‍न उपस्थित केला. यापुढे मदतनीचा पगार थेट खात्यावर जमा होईल, असे स्पष्ट करण्यात आले. या पथकात  पुणे विभागाचे उपसंचालक शरद गोसावी, पुण्याचे लेखाधिकारी अंकुश शहागंटवार आणि बीडचे अजय बहीर, लेखाधिकारी मकरंद सेवलीकर, उपशिक्षणाधिकारी राजेश जोशी यांचा समावेश होता. 

एकच रस्त्यावरील शाळेची तपासणी
बीडकडून आलेल्या पथकाने जालन्यात येताना शहागड येथील शाळेची तपासणी केली तर अंबडला पंचायत समितीने भेट दिली. यानंतर भोकरदन रस्त्यावरील पिरपिंपळगाव, मान देऊळगाव, राजूर या शाळेची तपासणी केली. पाच हजारांपैकी चार शाळेची तपासणी करून काय गुणवत्ता समजणार आहे. हा फक्‍त दिखावा असल्याची चर्चा आहे.

अचानक चव बदलली
समिती जिल्ह्यावर येणार याचे वेळापत्रक पूर्वीच जाहीर करण्यात आले. तपासणीसाठी जिल्ह्यात समिती येणार हे माहिती असल्याने शाळांनी तयारी केली होती. अनेक शाळांमधील खिचडीची चव, दर्जा गेल्या चार, पाच दिवसांत बदलली. बोटावर मोजण्या एवढ्याच शाळांची तपासणी आणि पूर्वीच वेळापत्रक माहिती असल्याने हा प्रकार एक औपचारिकता होती, अशी चर्चा आहे.