Wed, Feb 20, 2019 03:10होमपेज › Marathwada › नर्सी आरोग्य केंद्राची मदार कंत्राटी कर्मचार्‍यांवर 

नर्सी आरोग्य केंद्राची मदार कंत्राटी कर्मचार्‍यांवर 

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 12:48AMनर्सी नामदेव : भिकाजी कीर्तनकार

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना राहण्यासाठी घरे उपलब्ध असूनही सर्वच कर्मचारी अपडाऊन करत आहेत. या आरोग्य केंद्राचा सर्वभार येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यावर येऊन पडला आहे. आरोग्य अधिकारी नेहमीच दौर्‍यावर राहत असल्याने अनेक गरजू रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असल्याने आरोग्य सेवा ढेपाळल्याचे चित्र आहे.

नर्सी नामदेव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत 23 गावांचा समावेश आहे. या गावांमधील 56 हजार 500 नागरिकांना या केंद्रामार्फत आरोग्य सेवा दिली जाते. आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, 11 कर्मचारी आहेत, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रातील महत्त्वाच्या डॉक्टरांची बदली  होऊन 3 महिने उलटले तरी अद्यापही दुसर्‍या अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली नाही. एका वैद्यकीय अधिकार्‍यास काम सांभाळून इतर काम करणे अवघड झाल्याने आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे. 

सध्या या केंद्रात 1 वैद्यकीय अधिकारी, 1 आरोग्य साहायिका हे पद दोन वर्षापासून रिक्त आहे. एक सेवक आठ महिन्यांपासून रिक्त आहे. एका वर्षापासून औषध निर्मात पदही रिक्त आहे. या केंद्रांतर्गत डिग्रस, पहेणी येथे आरोग्य सेवकाचे पद भरण्यात आले नाही. तर दुसरीकडे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यावरच गोळ्या औषध देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. येथील कर्मचार्‍यांसाठी आठ घरांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी एकही कर्मचारी राहत नाही. सर्व घरे कुलूप बंद असतात. कंत्राटी कर्मचार्‍यावरच आरोग्य सेवेचा भार असल्याने अनेकदा वाद उद्भवत आहेत.  दररोज प्राथमिक आरोग्य केंंद्रात दीडशेच्या आसपास रुग्ण उपचारासाठी येतात. तर रात्रीच्या वेळी  येथे औषध उपचार करण्यासाठी व्यवस्था नसल्याने ना इलाजाने रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.