Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Marathwada › ‘पूर्णा’चे बिगर सभासद ऊस उत्पादक अडचणीत

‘पूर्णा’चे बिगर सभासद ऊस उत्पादक अडचणीत

Published On: Jul 04 2018 2:15AM | Last Updated: Jul 03 2018 8:57PMवसमत : इस्माईल जहागीरदार

अडचणीच्या काळात पूर्णा सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन कारखाना वाचविणार्‍या बिगर सभासद व गेटकेन ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस यावर्षीच्या गळीत हंगामात पूर्णा कारखान्याकडून गाळपासाठी घेतला जाणार नाही. कारखान्याच्या वतीने नुकत्याच बिगर सभासदांना नोटीस देण्यात आल्या असून, ऊस गाळपाचे नियोजन दुसरीकडे करण्याचा सल्‍ला देण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांमधून पूर्णा साखर कारखान्याविरोधात रोष व्यक्‍त केला जात आहे.

वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्र.1 व 2 मधील कार्यक्षेत्रात मागील चार ते पाच वर्षांपासून पर्याप्‍त ऊस नव्हता. या कारखान्याच्या गाळपासाठी बिगर सभासदांनी ऊस कारखान्याला देऊन कारखान्यास तारले, परंतु यावर्षी उसाची दुपटीने लागवड केल्याचा दावा करीत पूर्णा साखर कारखान्याने बिगर सभासदांना नोटीस बजावून ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्याचे सांगत उसाचे गाळप शक्य नसल्याचे सांगून, पूर्णा कारखान्यावर अवलंबून न राहता, उसाची गाळप व्यवस्था इतरत्र करावी, असे नोटीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून कारखान्याच्या वतीने बिगर सभासद ऊस उत्पादकांना या नोटीस बजावण्यात आल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

मागील वर्षी पूर्णाच्या युनिट क्र.1 ने चार लाख 13 हजार 363 टन गाळप केले होते. तर युनिट क्र.2 ने 2 लाख 24 हजार 430 टन उसाचे गाळप केले होते. दोन्ही कारखान्यांचे मिळून 6 लाख 37 हजार 793 टन उसाचे गाळप करण्यात आले होते.

सन 2018-19 साठी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी 9 हजार 200 हेक्टर ऊस लागवडीची नोंद केली आहे. तर युनिट क्र.2 च्या कार्यक्षेत्रांतर्गत 7 हजार 500 हेक्टर ऊस लागवडीची नोंद करण्यात आली आहे.

पूर्णाची दोन्ही युनिट गाळप क्षमता 2 हजार 500 मे टनची आहे. गतवर्षीपेक्षा ऊस लागवडीचे क्षेत्र 5 हजार हेक्टरने वाढल्यामुळे पूर्णाचे दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने चालवूनही कार्यक्षेत्रातील ऊस गाळप पूर्ण होणार नसल्यामुळे दोन्ही युनिटच्या कार्यक्षेत्रातील बिगर सभासदांना नोटीस बजावून गाळप करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांमधून कारखाना प्रशासनाविरोधात रोष व्यक्‍त केला जात आहे. कारखान्याला तारणार्‍या शेतकर्‍यांवर एकप्रकारे हा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून व्यक्‍त होत आहे.