होमपेज › Marathwada › शिंदे वस्तीच्या नशिबी अजूनही चप्पूचाच प्रवास

शिंदे वस्तीच्या नशिबी अजूनही चप्पूचाच प्रवास

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 10:29PMपाटोदा : महेश बेदरे

सौताडा गावापासून 8 किमी अंतरावर असलेल्या ‘शिंदेवस्ती’ या छोट्याशा गांवच्या वाट्याला अडचणीच आल्या आहेत. या गांवच्या बाजुला एक तलाव आहे व येथील मुलांना शिक्षण घेण्यासाठी हा तलाव ओलांडून जावे लागते. या ठिकाणी अजूनही पूल नाही तसेच दुसरा मार्ग नाही त्यामुळे ही मुले चक्क थर्माकोलच्या चप्पुचा आधार घेऊन धोकादायक रित्या तलाव ओलांडतात. गत वर्षभरात पाठपुरावा करून अद्यापही त्यांच्या अडचणी दूर झालेल्या नाहीत.शिंदेवस्ती या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्तादेखील नाही. या वस्तीवर ना दवाखाना आहे ना किराणा दुकान, गावात केवळ चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी मुलांना दुसर्‍या गावी जावे लागते. या गावालगतच तलाव असल्यामुळे मुलांना तलाव ओलांडूनच दुसरीकडे जावे लागते. त्यातच या ठिकाणी दवाखान्याची सुविधा नसल्यामुळे एखादी वृद्ध व्यक्ती वा गरोदर बाई, लहान मुले यांना उपचारासाठी न्यायचे असल्यासही तलाव पार करावा लागतो. त्यातच किराणा दुकानही नसल्यामुळे रोजच्या लागणार्‍या वस्तू ही घ्यायच्या म्हटले तरी तलावच ओलांडून जावे लागते.  या ठिकाणी पूल व दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे येथील लोकांना चप्पुवरूनच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामध्ये पावसाळ्यात तर पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे धोका वाढतो.

स या भागातील लोकप्रतिनिधींच्या मते हा पूल तलावावर करायचा असल्याने काही तांत्रिक अडचणी येत आहेत. तर ग्रामस्थांच्या मते या ठिकाणी एक 15 वर्ष जुना छोटा पूल असून जर त्याची उंची काही प्रमाणात वाढवली तरीही हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

अच्छे दिन केव्हा येणार 

सध्या सरकारचा अच्छे दिनचा नारा सुरू आहे. ग्रामीण भागात सर्व सोयीसुविधा पोहोचवण्यावर सरकार प्रचंड खर्च करीत आहे, मात्र शिंदेवस्ती वरच्या मुलांच्या जीवघेण्या प्रवासाकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. आमच्या गावात अच्छे दिन केव्हा येणार असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत. 

Tags : Marathwada, No, development,  shindewadi