Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Marathwada › सिंचनासाठी नऊ कोटी ८३ लाखांचा निधी

सिंचनासाठी नऊ कोटी ८३ लाखांचा निधी

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:38PMहिंगोली : प्रतिनिधी 

जिल्ह्यात सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी नऊ कोटी 83 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नगरपालिकेंतर्गत विकासकामांसाठी चोवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनुशेषाच्या कामासोबत पालिकांतर्गत विकासकामांना वेग येणार आहे.

जिल्ह्यात सिंचनाच्या अनुशेषाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष वेगळा करून तातडीने सिंचनासाठी निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला आहे. त्यानंतर शासनाने हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मान्य करून सिंचनाची कामे करण्यासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी निधीबाबत पाठपुरावा सुरू केला होता. पुरवणी अर्थ संकल्पामध्ये जिल्ह्याच्या अनुशेषासाठी निधी देण्याची मागणी आ.मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार नऊ कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्रही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ.मुटकुळे यांना दिले आहे.

हिंगोली नगरपालिका व सेनगाव नगर पंचायतीला विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार हिंगोली पालिकेला विकासकामांसाठी दहा कोटी रुपये तर सेनगावला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ.मुटकुळे, सेनगावचे नगराध्यक्ष अभिजित देशमुख यांना दिले आहे. पुढील काही दिवसांतच सिंचनाच्या अनुशेषाच्या कामासोबत हिंगोली व सेनगाव शहरामध्ये विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.