Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Marathwada › निमला गाव वॉटरकप स्पर्धेसाठी सरसावले

निमला गाव वॉटरकप स्पर्धेसाठी सरसावले

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:07PMतेलगाव :  प्रतिनिधी

धारूर तालुक्यातील निमला गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने तुफान आणले आहे. ग्रामस्थांनी एकमताने श्रमदानास सुरुवात केली आहे. तीनशे ते चारशे लोकसंख्या असलेले गाव याच कामाला लागलेे आहे. निमला गावातील इंदुबाई महादेव नरवटे या महिलेने शेतीमध्ये बोर घेऊनही पाणी लागत नसल्याने, विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेतली. निमला गाव पाणी दार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

दरम्यान, ज्ञान प्रबोधनी संस्था अंबाजोगाई व महाराष्ट्र पोलिस बॉइज आसोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब फपाळ पाटील यांनी निमला गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे मनोबल वाढवले. स्वत: श्रमदान करत गावकर्‍यांना प्रोत्साहित केले. पाणी फाउंडेशंनच्या या स्पर्धेसाठी तसेच निमला गावात जलसिंचन प्रभावी राबवण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी यांच्या तर्फे निमला गावाला जेसीबी 150 तास काम केले जाईल ऐवढे अर्थ सहाय्य करण्यात आले. त्यामुळे गावाला या कामांचा भरपूर फायदा होणार असून, गावकर्‍यांचे मनोबल वाढण्यास मदत झाल्याचे उपसरपंच वैद्यनाथ नरवटे यांनी सांगितले.


या वॉटरकप कामासाठी निमला येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा पोटलावार, शंकर चामनर यांनी निधी दिला. महावितरण कंपनीचे कर्मचारी शिवाजी व्हरकटे यांनी ही अर्थ सहकार्य केले. वॉटरकप स्पर्धेसाठी निमला गावातील तरुणापासून ते वृद्धांपर्यंत महिला पुरुष श्रमदान करण्यासाठी जोमाने काम करत आहेत. अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेत पाणी चळवळीत अशा प्रकारे या स्पर्धेत सहभागी गावांना मदत केल्यास, महाराष्ट्र पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही. ग्रामस्थांचे श्रम व सामाजिक संस्थांचे आर्थिक सहाय्य महाराष्ट्रात पाणी चळवळीला तुफान आणणार हे मात्र निश्‍चित आहे.

Tags : Matathwada, Nimla, village, participated,  watercup, competition