होमपेज › Marathwada › स्त्री जातीचे नवजात अर्भक जिवंत आढळले

स्त्री जातीचे नवजात अर्भक जिवंत आढळले

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 2:06AMगेवराई : प्रतिनिधी

गेवराई शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहागड येथे स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे अर्भक शहागड येथील एका हॉटेलच्या पाठीमागे काटेरी झुडुपात आणून टाकल्यामुळे अनेक तर्क-वितर्काना वेग आला होता, मात्र पोलिसांनी काही तासांतच छडा लावला.

गेवराई शहरातील एक मजूर महिला शहागड येथील धाब्यावर स्वयंपाक काम करण्यासाठी जाते. शुक्रवारी दि.27 रोजी रात्री 10 वा सुमारास काम उरकवून गेवराईकडे परतत असताना त्या महिलेला हॉटेलच्या पाठीमागे लहान मूल रडण्याचा आवाज आला, दरम्यान महिलेने त्या दिशेने धाव घेऊन पाहिले असता काटेरी झुडुपाच्या गवतामध्ये 2 दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक फेकल्याचे निर्दशनास आले.

या घटनेची माहिती मिळताच शहागड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, तसेच जिवंत स्त्री जातीचे अर्भक या महिलेच्या मदतीने गेवराई शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, दरम्यान या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हे अर्भक कोणी फेकले याचा तपास पोलिसांनी सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता सदरील अर्भक सापडल्याचा बनाव करणार्‍या महिलेचेच असल्याचे निष्पन्न झाले.

महिला व अर्भक गोंदी पोलिसांच्या ताब्यात

महिलेचा बनाव गेवराई पोलिसांनी उघड केल्यानंतर ही घटना अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने पुढील चौकशीसाठी महिला व स्त्री जातीचे अर्भक गोंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली, तसेच गतवर्षी या महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.