Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Marathwada › राज्य परिवहन महामंडळाच्या २ हजार कर्मचार्‍यांनाच मिळणार नवीन गणवेश

राज्य परिवहन महामंडळाच्या २ हजार कर्मचार्‍यांनाच मिळणार नवीन गणवेश

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:33PMपरभणी : नरहरी चौधरी

राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागांतर्गत काम करणार्‍या एकूण 2300 पैकी तब्बल 2 हजार कर्मचार्‍यांनाच नवीन गणवेश मिळणार आहे. दरवर्षी मिळणार्‍या कपडाऐवजी आता थेट शिवणकामातून ड्रेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण सात आगार आहेत. यात परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, हिंगोली, वसमत, कळमनुरी यांचा समावेश आहे. विभागातून तब्बल 387 बसेस धावतात. तसेच 2 हजार 300 कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील 2 हजार 71 कर्मचार्‍यांनीच गणवेशाकरिता निवड झालेली आहे. पण उर्वरित कर्मचार्‍यांना गणवेश कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या नियुक्‍तीनुसार गणवेश असणे आवश्यक आहे. एकाच विभागातील कर्मचारी त्याच गणवेशात असणे बंधनकारक आहे. शासनाकडून त्याची पूर्तताही दरवर्षी केली जाते. यात 6 जानेवारी रोजी एका कार्यक्रमात केवळ 39 कर्मचार्‍यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टेक्निशियन कर्मचार्‍यांचे शूज योग्य न आल्याने ते संबंधित कंत्राट असलेल्या मुंबईच्या कंपनीला परत करण्यात आले आहेत. यावर्षी मिळणार्‍या गणवेशाकरिता मात्र संबंधित पात्र कर्मचार्‍यांना कमालीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

गणवेश व शूजसाठी मुंबईच्या कंपनी : बस कर्मचार्‍यांना गणवेश व शूजचे वाटप केले जाते. यासाठी निविदा काढून कंपनीची निवड केली गेली आहे. यात गणवेशाकरिता गुनिना कमर्शियल प्रा.लि.मुंबई तर शूजकरिता हिंदुजा इंटरनॅशनल मुंबई या कंपनीची निवड झालेली आहे.  

या विभागातील कर्मचार्‍यांना मिळणार ड्रेस : परभणी विभागांतर्गत असलेल्या एकूण सर्वच कर्मचार्‍यांपैकी चालक-842, वाहक-562, वाहतूक पर्यवेक्षीय कर्मचारी-100, यांत्रिकी पर्यवेक्षीय-8, यांत्रिकी कर्मचारी-359, शिपाई-13 यांना गणवेश मिळणार आहेत. बस कर्मचार्‍यांच्या चालक-वाहक व शिपाई यांना मिळणार्‍या दोन गणवेशासाठी तसेच यांत्रिकी विभागातील कर्मचार्‍यांकरिता 3 ड्रेसकरिता यापूर्वी दरवर्षीच कपडा पाठवला जायचा, पण यावर्षापासून त्यांच्यासाठी आता शिवणकामातून कपड्यांची उपलब्धता केली जाणार आहे.