Fri, Jul 19, 2019 01:21होमपेज › Marathwada › नूतन सीईओंना  भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान

नूतन सीईओंना  भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान

Published On: Feb 05 2018 2:05AM | Last Updated: Feb 04 2018 10:58PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा परिषद मागील काही महिन्यांपासून या ना त्या कारणाने गाजत आहे. त्यात सीईओ सुशील खोडवेकरांच्या काळात भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे समोर आली आणि त्याच कारणावरून त्यांची चौकशी सुरू झाली. त्यांच्या बदलीनंतर प्रभारी सीईओ म्हणून प्रताप सवडे यांनी जि. प. च्या कामाची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला. आता मात्र जि. प. प्रशासनाची धुरा सांभाळण्यासाठी भंडार्‍याहून नुकतीच बदली झालेले सनदी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज परभणीत येत आहेत. त्यांच्यापुढे भ्रष्टाचार रोखण्याचे प्रमुख आव्हान राहणार आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांतील विभागप्रमुख व अधिकारी यांच्या मनमानीने भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची नागरिकांत चर्चा आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे न करताच लाखो रुपयांची बिले उचलली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार रोखण्याचे मोठे आव्हान नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्यासमोर राहणार आहे. 

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तत्कालीन सीईओ सुशील खोडवेकर यांच्यावर आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधिमंडळात केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. खोडवेकरांच्या बदलीनंतर येथे ऑगस्ट 2017 पासून कोणताही सनदी अधिकारी येण्यास धजावत नव्हता. यामुळे आतापर्यंत अतिरिक्‍त सीईओ प्रताप सवडे यांच्याकडेच हा पदभार दिलेला होता. खोडवेकरांंनी 2016-17 या काळात वैयक्‍तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा करण्याचे शासनाचे आदेश होते; पण एरंडेश्‍वर प्रतिष्ठान व दुर्डी येथील बचतगटास प्रतिलाभार्थी 7 हजार रुपये याप्रमाणे 3 कोटी 35 लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून वितरित केले. तसेच तब्बल 41 लाख रुपयांची जिल्हा परिषद सेस निधीची उधळण गरज नसताना कार्यालय व निवासस्थानावर केली. यातच त्यांच्या उचलबांगडीनंतर जिल्हा परिषदेचे कामकाज हे प्रभारी अधिकार्‍यांवर कार्यरत होते. यातून अधिकार्‍यांवर वरिष्ठांचा अंकुश न राहिल्याने मनमानी कारभाराची पद्धत सुरू झाली. सत्ताधारी हे विरोधकांना कुठेही विश्‍वासात न घेता निधीचे वाटप करत आलेे. याला लगाम बसविण्याचे मोठे आव्हान आता कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी पृथ्वीराज यांच्यासमोर राहणार आहे. ते कितपत याला रोख लावतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.