होमपेज › Marathwada › धर्म, राजशक्तीतून होते विधायक कार्य

धर्म, राजशक्तीतून होते विधायक कार्य

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 05 2018 11:50PMबीड : प्रतिनिधी

धर्मशक्ती आणि राजशक्तीतून विधायक कार्य होत आले आहे. यापुढेही आपण कोणत्याही धार्मिक व्यासपीठाचा राजकारणासाठी वापर करणार नाहीत, हीच आपली भूमिका राहिली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. शिरूर तालुक्यातील तागडगाव येथील नारळी सप्ताहाची सांगता गुरुवारी मोठ्या उत्साहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सप्ताह सांगतेप्रसंगी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, भगवान गडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज, ह. भ. प. राधाताई सानप, प्रज्ञाताई मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. भाविकांसमोर आपल्या भावना व्यक्‍त करताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, नारळी सप्ताहाचे व्यासपीठ हे राजकीय नाही त्यामुळे इथे राजकीय भाषणाचा प्रश्नच येत नाही. भगवान गडाची लेक म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे. भगवान बाबांच्या कोणत्याही मंचावर असले की, मला दहा हत्तीचे बळ येते. सप्ताहाला हेलिकॉप्टरने यावे, ही लोकांची इच्छा होती, परंतु हेलिकॉप्टर मिळत नव्हते. शेवटी बाबांचा आशीर्वाद असल्यामुळेच मी तुमची इच्छा पूर्ण करून, हेलिकॉप्टरने येथे येऊ शकले. 

समाजाने एकसंघ रहावे 

समाजाला जातीधर्माच्या नावावर फूट पडणारी वाळवी सध्या लागली आहे, अशा परिस्थितीत एकमेकांशी वाद किंवा भांडण न करता एकजुटीने राहणे हीच खरी आपली शक्ती आहे. ऊसतोडणार्‍याच्या हातात परत कोयता येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे पंकजाताई म्हणाल्या. यावेळी त्यांनी भगवानबाबांचे विचार आपण कधीही खाली पडू देणार नसल्याचे सांगितले. धर्म शक्ती आणि राज शक्ती यामध्ये फार मोठी ताकद आहे.

ह्या दोन्ही शक्ती जशा श्रद्धेचे आणि विकासाचे बीज लावू शकतात तसाच संहार देखील करू शकतात. पण हा संहार प्रकृतीचा करायचा की प्रवृतीचा करायचा हे ठरविणे आवश्यक आहे. धर्मशक्ती आणि राजशक्ती या दोन स्वतंत्र ताकदी आहेत. या दोन्हींच्या कोणत्याही मंचाचा वापर राजकारणासाठी झाला नाही पाहिजे, ही नेहमीच भूमिका राहिली आहे. हीच प्रथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वर्षानुवर्षे पाळली असे त्या म्हणाल्या.

लाडक्या लेकीची जंगी मिरवणूक 

पंकजाताई मुंडे यांचे सकाळी तागडगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी गावकर्‍यांनी खास सजवलेल्या रथातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. सप्ताहासाठी आलेले पंचक्रोशीतील भाविक तसेच महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठावर आगमन होताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. भगवानबाबा की जय, मुंडे साहेब, अमर रहेफ, कोण आली, कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आलीच्या घोषणांनी वातावरण यावेळी दुमदुमून गेले होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची भगवानबाबांवर अपार श्रद्धा होती. लोकांना ते नेहमी देत गेले आणि हिच खरी संतांची शिकवण असल्याचे, त्या म्हणाल्या.