Mon, May 20, 2019 10:46होमपेज › Marathwada › नांदेड : मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

नांदेड : मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

Published On: Apr 16 2018 4:55PM | Last Updated: Apr 16 2018 4:55PMनांदेड : प्रतिनिधी

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच आयुक्त म्हणून रूजू झालेल्या गणेश देशमुख यांची पनवेल महापलिका आयुक्तपदी बदली झाली आहे. दरम्यान, नांदेड महापालिका आयुक्त पदी एस. एल. माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत 3 मे 2017 रोजी  रूजू  झालेल्या  आयुक्त देशमुख यांच्या  कार्यकाळात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्टोबर 2017 मधे सुरळीत पार  पडल्या. राज्यात पहिल्यांदाच व्हीव्ही पॅट चा यशस्वी प्रयोग नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत झाला. निवडणुकीनंतर शहरासाठी गंभीर बनलेल्या कचरा प्रश्नाची उकल त्यांनी  केली. पुढे हा  प्रश्न न्यायालयात गेला. तिथेही महापालिकेची बाजू सक्षमपणे मांडत महापलिकेच्या बाजूने  निकाल  मिळवला. कालच 15 एप्रिल रोजी राज्य शासनाने नांदेड  महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करताना 27 कोटी  रूपये निधी  मंजूर  केला आहे.  नांदेड  येथील श्री  गुरु  गोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासासाठीही 43 कोटीचा निधी आयुक्त देशमुखांच्या  कार्यकाळात मंजूर झाला आहे. 

महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्यात देशमुख यशस्वी झाले होते. शहरवासियाना विकासाच्या मोठ्या  अपेक्षा  देशमुख यांच्याकडून  होत्या.  मात्र वर्षभरातच त्यांची बदली  झाली. यासोबतच नांदेड महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात  असली  तरी  त्यांनी आपल्या 11 महिन्यांच्या कार्यकाळात राज्य शासनाकडून आपल्या  कुशलतेने  निधी खेचून  आणला. शहराची पावले  विकासाकडे सरकत असताना आयुक्त देशमुख  यांची  बदली होणे ही  बाब  शहराच्या विकासाची  गती  थांबवणारी ठरल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.