Tue, Aug 20, 2019 16:05होमपेज › Marathwada › कर्जासाठी पालिका कर्मचार्‍यांचे उपोषण

कर्जासाठी पालिका कर्मचार्‍यांचे उपोषण

Published On: May 31 2018 1:40AM | Last Updated: May 30 2018 10:46PMबीड : प्रतिनिधी

नगर परिषदेतील कर्मचार्‍यांना बँकांनी कर्जाचे प्रस्ताव मंजूर करावेत, या मागणीसाठी नगर परिषद कर्मचार्‍यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मात्र बँक तत्काळ कर्ज उपलब्ध करून देते. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन देखील कर्मचार्‍यांच्या पगारासोबतच होत आहेत. असे असताना त्यांना कर्ज दिले जाते मात्र, सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांना पगार तारण कर्ज नाकारले जात आहे. ज्या पालिका कर्मचार्‍यांनी कर्जासाठी अर्ज केले आहेत, अशांना तत्काळ सात दिवसांच्या आत कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी पालिका कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

नगर परिषदेतील काही कर्मचार्‍यांनी 10 मे 2018 रोजी पगार तारण कर्ज मिळण्यासाठी भारतीय स्टेट बँकेकडे अर्ज केला होता. याबाबत अग्रणी बँकेलाही कळविले होते, मात्र बँकेत कर्मचारी कर्जाबाबत विचारपूस करण्यासाठी गेले असता, नगर परिषद कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्‍यांना बँकेकडून कर्ज देता नसल्याचे बँक अधिकारी सांगतात. उपोषणात दिलीप गवळी, देवानंद शिंदे आदी सहभागी झाले आहेत.