होमपेज › Marathwada › मुंडे भगिनींच्या मॅरेथॉन दौर्‍यांमुळे मतदारसंघ चर्चेत

मुंडे भगिनींच्या मॅरेथॉन दौर्‍यांमुळे मतदारसंघ चर्चेत

Published On: Feb 12 2019 1:07AM | Last Updated: Feb 12 2019 1:07AM
पाटोदा : महेश बेदरे

मागील काही दिवसांपासून मुंडे भगिनींचे विविध कार्यक्रमांच्या निमित्त आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात अगदी मॅरेथॉन दौरे सुरू आहेत. दौर्‍यांमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. इतर मतदारसंघांच्या तुलनेत मोठा व तीन तालुक्यांचा मिळून असलेल्या आष्टी मतदारसंघाला सध्या दोन आमदार व जिल्हा परिषद अध्यक्ष लाभले आहेत. सहाजिकच मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असून लोकसभा निवडणुकांमध्ये देखील या मतदारसंघाची निर्णायक भूमिका असणार आहे.

संपूर्ण राज्यात चर्चेत असलेला पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा मागील दोन वर्षांपासून याच मतदारसंघातील सावरगावात होतो. यंदाच्या मेळाव्यानंतर  मागील काही दिवसांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मतदारसंघात येत आहेत. काही दिवसांपूर्वी आ.सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभासाठी पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. पुढे काही दिवसांतच पाटोदा व कडा येथे आ. भीमराव धोंडे यांनी आयोजित केलेल्या रस्ता कामांच्या व विकास कामांच्या शुभारंभासाठी त्या आल्या होत्या. या वेळी पंकजा यांनी आ. धस व आ. धोंडेंसह रेल्वे कामाच्या प्रगतीचीही पाहणी करुन दोन्ही आमदार एकाच राजकीय गाडीतून विनाअडथळा प्रवास करू शकतात हे दाखवून दिले होते. शिरुर तालुक्यातही पंकजा मुंडे यांचा विकास कामांच्या शुभारंभासाठी दौरा झाला. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला डॉ. प्रितम मुंडे यांनी हजेरी लावली होती. आता नुकत्याच कडा येथे पार पडलेल्या आ. भीमराव धोंडे यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला पुन्हा एकदा एकत्रितपणे मुंडे भगिनींनी हजेरी लावली. मुंडे भगिनींच्या या दौर्‍यांमुळे हा मतदार संघ सध्या चर्चेत आला आहे.  आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ. साहेबराव दरेकर ही दिग्गज नेत्यांची फौज भाजपकडे आहे.