Fri, Aug 23, 2019 14:24होमपेज › Marathwada › मुक्ताईची पालखी बीडमध्ये

मुक्ताईची पालखी बीडमध्ये

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 9:58PMबीड : प्रतिनिधी

मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरपूरकडे निघालेली मुक्ताईची पालखी बीड शहरात सोमवारी सकाळी टाळमृदंगाच्या साथीने ‘मुक्ताबाई... मुक्ताबाई... आदिशक्ती मुक्ताबाई’ चा गजर करत दाखल झाली. विठू नामाचा गजर करत आलेली मुक्ताईची पालखी व्यसनमुक्ती आणि प्लॅस्टिक बंदीचा सामाजिक संदेशही घेऊन आली आहे. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात बीडकरांनी वारकरी आणि पालखीचे   स्वागत केले. 

आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेली मुक्ताईची पालखी   सोमवारी माळीवेस येथील हनुमान मंदिरात व उद्या मंगळवारी मोंढा भागातील बालाजी मंदिरात मुक्कामी थांबणार आहे. पालखीचे बीड शहरात आगमन होताच ढोल पथक, फ टाक्यांची आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. आज एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी विविध फ ळे व फ राळाचे वाटप ठिकठिकाणी करण्यात येत होते. अ‍ॅपेचालक संघटनेच्या वतीने अण्णा भाऊ साठे चौकात वारकर्‍यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी स्वागतप्रसंगी बीड शहरातील स्थानिकच्या ढोल पथकाने अतिशय शिस्तबद्ध प्रदर्शन करून लक्ष वेधून घेतले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर बीड शहर व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

वारकर्‍यांच्या हाती कापडी बॅग

शासनाने केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर दिंडीत प्लॅस्टिक वापर टाळला जात आहे. वारकर्‍यांनी स्टीलचे ताट, वाटी आणि तांब्या सोबत ठेवला असून प्लॅस्टिक पिशव्यांना फ ाटा देत कापडी पिशव्यांमध्ये आपले उपयोगी साहित्य सोबत ठेवले आहे. प्रवासादरम्यानही प्लॅस्टिक वापरणे टाळले जाणार आहे.

वारकर्‍यांना व्यसनमुक्तीची शपथ

दिंडीमध्ये सहभागी वारकर्‍यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली आहे. तंबाखू किंवा अन्य कुठलेही व्यसन वारीदरम्यान न करण्याचे वारकर्‍यांनी ठरवले असल्याचे पालखी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले. प्रतिवर्षी सहभागी होणारे वारकरी हा नियम प्रवासादरम्यान काटेकोरपणे पाळतात असेही हरणे महाराज यांनी सांगितले.

309 वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडीत जवळपास साडेबाराशे महिला-पुरुष वारकरी आहेत. यांच्या संरक्षणासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त दिंडीसोबत असायला हवा, परंतु जालना जिल्ह्यात आम्हाला कसलेही पोलिस संरक्षण मिळाले नाही. बीड जिल्हा हद्दीत प्रवेश झाल्यापासून पोलिस संरक्षण आहे. कुठलीही अडचण आलेली नाही, वारकरी आनंदात मार्गक्रमण करत आहेत. या स्वागताने आम्ही भारावून गेलो आहोत.

: अ‍ॅड. रवींद्र पाटील, अध्यक्ष, मुक्ताईनगर संस्थान.

मध्यप्रदेशातील वारकरी अधिक

मुक्ताईनगर येथून निघालेल्या या दिंडीत खान्देश, विदर्भ, मराठवाड्याबरोबरच मध्यप्रदेशातील खांडवा, नेपानगर, बर्‍हाणपूर, बडवाह या जिल्ह्यातून सहभागी झालेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. हे भाविक मोठ्या उत्साहात दिंडीत सहभागी होत असल्याचे दिंडी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले.