परभणी : प्रतिनिधी
भारस्वाडा येथील आरोग्य उपकेंद्रात कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी देण्यात यावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि.22) सकाळी 11 ते दुपारी 12 च्या दरम्यान गावकर्यांनी जिल्हा आरोग्य विभागासमोर आंदोलन केले. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, परंतु आरोग्य विभागाकडून तक्रार न करण्यात आल्याने शेवटी सायंकाळी 4 वाजता आंदोलकांना सोडून देण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली.
कायमस्वरूपी आरोग्य सेविकेची नियुक्ती केलेली आहे, परंतु काही महिन्यांपासून सेविकेची इतरत्र बदली करण्यात आली आणि त्याठिकाणी कंत्राटी पध्दतीने कार्यरत आरोग्यसेविकेची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु सदरील सेविका उपकेंद्रात मुक्कामी राहत नाही. शिवाय अनेकवेळा उपकेंद्रात हजर राहत नसल्यायामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी 50 ते 60 ग्रामस्थांनी डॉ. बालाजी शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन कर्मचारी देण्याची मागणी केली. ते दौर्यावर असल्यामुळे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खंदारे यांनी गावकर्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि भारस्वाडा आरोग्य उपकेंद्रास तात्पुरत्या स्वरूपात नवीन कर्मचारी देण्याचे आश्वासन दिले.दरम्यान मोठ्या संख्येने गावकरी आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. नवा मोंढा ठाण्याचे निरीक्षक नरसिंग ठाकूर यांनी सर्व ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात नेले. परंतु या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोणतीही तक्रार देण्यात आलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही.