Sun, Mar 24, 2019 05:03होमपेज › Marathwada › मोबाइलच्या अतिवापराने बालकांमध्ये दृष्टिदोष

मोबाइलच्या अतिवापराने बालकांमध्ये दृष्टिदोष

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:31PMसेनगाव : जगन्नाथ पुरी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह वयाने मोठ्या मंडळीत अ‍ॅन्ड्राईड मोबाइल वापराची के्रझ वाढली आहे. त्यांचे अनुकरण लहान बालके करू लागली आहेत. लहान मुलांच्या लाड व हट्टापोटी गेम खेळण्यासाठी अ‍ॅन्ड्राईड मोबाइलवर तासन्तास टाईमपास करणार्‍या लहान बालकांना दृष्टिदोषाच्या परिणामाला सामोर जावे लागत आहे. त्यामुळे कमी वयात चष्मे लागणार्‍या बालकांचे प्रमाण वाढू लागले आहे.

अ‍ॅन्ड्राईड मोबाइल वापरणार्‍यांची अलीकडच्या काळात प्रमाण वाढले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह वयाने मोठ्या मंडळींना या मोबाईलचे आकर्षण वाढले, त्यामुळे अन्न,वस्त्र, निवारा या प्रमुख गरजेप्रमाणे अ‍ॅन्ड्राईड मोबाइल काळाची गरज बनली. सोशल मीडिया व इंटरनेट वापरासाठी या मोबाइलचा प्रभावी फायदा होत आहे. मात्र मोबाइल अति वापरामुळे दृष्टिपटलावर विपरीत परिणाम होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

मोठ्याचे अनुकरण लहान बालके सहज करू लागले असून लहान मुलांच्या लाड व हट्टापोटी मोबाइल खेळण्यासाठी दिल्या जात आहे. ही सवय बालकांना जडू लागली आहे. परिणामी बर्‍याच वेळा बालके मोबाइल गेम खेळण्यात रंगून चालली आहेत. अ‍ॅन्ड्राईड मोबाइलच्या स्क्रीन प्रकाशाचा दृष्टीवर विपरीत परिणाम झाल्याने वाचन करणे, दुरचे दिसण्यासाठी डोळ्यांवर ताण द्यावा लागत आहे. मोबाइलचे व्यसन जडणार्‍या बालकांना कमी वयातच पॉइंटचे चष्मे लागत आहेत.

घरातील मोठ्या मंडळींनी लहान बालकांना या मोबाइल पासून दूर ठेवणे गरजेचे बनले आहे. पाच ते दहा वर्षे वयोगटांतील बालकांना मोबाइल स्क्रीनच्या प्रकाशाचा विपरीत परिणामाला सामोर जावे लागत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थीही अ‍ॅन्ड्राईड मोबाइलकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय कळत नकळत इंटरनेट वापरत चुकीच्या बेवसाईटवरही विद्यार्थी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाइल वापरामुळे वाचन संस्कृती धोक्यात येऊ शकते. अज्ञान व किशोरवयीन विद्यार्थी एकदा मोबाइल वापराच्या व्यसनात अडकले की त्यातून लवकर सुटका होत नाही.

दरम्यान कुटुंबीयांनीच लहान बालके व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अ‍ॅन्ड्राईड मोबाइल वापरापासून दूर ठेवणे गरज आहे. अन्यथा कमी वयात दृष्टी पटलावर विपरीत परिणामामुळे चष्मे वापराशिवाय पर्याय नाही. नैसर्गिक दृष्टी टिकवून ठेवणे ही जबाबदारी कुटुंबीयांची आहे.