होमपेज › Marathwada › शहरात अफवांमुळे बाजारपेठेत दहशत 

शहरात अफवांमुळे बाजारपेठेत दहशत 

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 1:01AMपरभणी : प्रतिनिधी

 मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक व पोलिसांनी केलेला लाठीचार्ज या घटनांमुळे शहरातील व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने जनतेला अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन केलेले असतानाही 27 जुलै रोजी शहरातील विविध भागात अफवांचे पेव फुटले आणि दुपारी  1 ते 3 च्या सुमारास व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद करुन ठेवली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदेंना  26 जुलै रोजीच्या श्रध्दांजली अर्पण करून धरणे धरण्यासाठी आयोजित आंदोलनास हिंसक वळण लागल्याने शहरात विविध ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले आणि जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्जही झाला.  आठ दिवसांपासून राज्यात मराठा समाज ठोक मोर्चे, आंदोलने करीत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर परभणीत आंदोलनाचे सत्र सकल मराठा समाजाने सुरूच ठेवले असल्याने आठवडाभरापासून शहरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. यामुळे दररोज कुठे-ना कुठे मराठा युवक रस्त्यावर उतरले असल्याची चर्चा शहरातील गल्लीबोळात होत आहे. परिणामी आंदोलकांची धडकी मनात बाळगून व्यापार करीत असलेल्या शहरातील बाजारपेठेत व्यापार्‍यांमध्ये 26 जुलैच्या तुफान दगडफेकीमुळे चांगलीच भीती निर्माण झाली आहे. दुकानाच्या काच फुटून नुकसान होण्याऐवजी व्यवहार व दुकान बंद करून दगडफेकीत होणारे नुकसान टाळणे व्यापार्‍यांनी पसंत केले. जागो-जागी 27 जुलै रोजीच्या चक्का जामची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. याच दरम्यान जिंतूर रोड, वसमत रोड, नांदखेडा रोड, कारेगाव रोड, गंगाखेड रोड आदी भागामंध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याची माहिती मिळताच शहरातील मोंढा, गव्हाणे चौक, स्टेशन रोड, गांधी पार्क, क्रांती चौक, स्टेडिअम कॉम्प्लेक्स या भागातील काही व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.