Mon, Apr 22, 2019 04:10होमपेज › Marathwada › मराठवाड्यातील साखर कारखान्यांना ऊर्जितावस्‍था

मराठवाड्यातील साखर कारखान्यांना ऊर्जितावस्‍था

Published On: Jun 03 2018 12:27PM | Last Updated: Jun 03 2018 12:27PMऔरंगाबाद : राहुल जगदाळे/जयपाल वाघमारे

गतवर्षी पावसाने साथ दिल्यामुळे मराठवाड्यातील साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्‍त झाली. साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. चालू वर्षीच्या हंगामातही उसाचा पेरा वाढणार असल्याने पुढील वर्षी उसाचे पीक अमाप येणार असून, साखरेचे उत्पादन वाढणार आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद आणि नांदेड येथे साखर सहसंचालकांची कार्यालये आहेत. औरंगाबाद येथील कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड आणि खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद विभागात गेल्या गळीत हंगामात 22 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले होते, हा आकडा यंदा चार पटींनी वाढून 86 लाख 75 हजार 117 टनांवर पोहोचला. यातून जवळपास 84 लाख 62 हजार क्विंटलवर साखरेचे उत्पन्‍न मिळाले आहे. विशेष म्हणजे 2018-19 हंगामासाठी विभागात 32 हजार हेक्टरने उसाचा पेरा वाढला असून पुढील वर्षी विक्रमी एक कोटी टन उसाचे उत्पादन होईल, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

औरंगाबाद विभागात झालेल्या 86 लाख 75 हजार 117 मेट्रिक टन उसाच्या एफआरपी पोटी कारखान्यांकडून शेतकर्‍यांना एक लाख 61 हजार 397 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, पण हंगाम संपून दीड महिना लोटला तरी 16 हजार 632 लाखांचा मावेजा थकवला आहे. शेतकर्‍यांना 89.69 टक्के म्हणजे एक लाख 44 हजार 765 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. बहुतांश कारखान्यांनी अद्याप क्लोजिंग रिपोर्टही दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे विभागातील कारखान्यांनी केंद्र शासनाच्या 2550 रुपयांचा एफआरपी न देता 1800 ते 2050 इतकाच दर दिलेला.
नांदेड विभागात विक्रमी उत्पादन
नांदेड येथे असलेल्या साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यांतील 32 कारखान्यांतून 1 कोटी 25 लाख 7 हजार 626 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंतच्या काळातील सर्वाधिक विक्रमी उत्पादन आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत ऊस लागवड क्षेत्रामध्ये सत्तर हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षीही कारखाने चांगल्या प्रकारे चालतील, असे चित्र आहे.
2017-18 या वर्षामध्ये नांदेड विभागातील नांदेड,  हिंगोली, परभणी, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत 1 लाख 32 हजार 500 हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. त्यामुळे बंद असणारे काही कारखाने सुरू झाले. या पाच जिल्ह्यांत 47 कारखान्यांपैकी 32 कारखाने सुरू झाले. यात 18 खासगी व 16 सहकारी कारखान्यांचा समावेश होता. या 32 कारखान्यांमधून 1 कोटी 17 लाख 36 हजार 669 मेट्रिक टन साखरेचे गाळप झाले, तर यातून 1 कोटी 25 लाख 7 हजार 626 क्‍विंटल साखर उत्पादित झाली. याचा उतारा 10.66 इतका निघाला. आतापर्यंतच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन कधीच झाले नव्हते. चांगला पाऊस झाल्याने एक लाख 99 हजार 703 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात 62 हजार 300, उस्मानाबाद जिल्हा 57 हजार 200, त्यानंतर परभणी जिल्ह्यात 45 हजार 700, नांदेड-23 हजार 303 व सर्वाधिक कमी हिंगोली जिल्ह्यात 11 हजार 200 हेक्टर लागवड झाली आहे. 2016-17 च्या तुलनेने 2017-18 मध्ये 68 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. 

दोन कारखान्यांवर आरआरसी

शेतकर्‍यांना एफआरपीची रक्‍कम देण्यात कसूर करणार्‍या बीड जिल्ह्यातील दोन कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रनुसार (आरआरसी) कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.
गेल्यावर्षी मराठवाडा विभागात 22 हजार टन उसाचे गाळप झाले होते. यात चार पटींनी वाढ होऊन 86.75 लाख  टनापेक्षा जास्तचे गाळप झाले. यंदा उसाखालील क्षेत्रही 32 हजार हेक्टरने वाढले असून पुढील हंगामात एक कोटी टनाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. कारखान्यांकडील शेतकर्‍यांची थकीत रक्‍कम देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दोन कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.
- नीलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक (साखर)