Tue, Jun 25, 2019 21:34होमपेज › Marathwada › मराठा समाज आरक्षण : अनेक ठिकाणी दगडफेक,रास्ता रोको

मराठा समाज आरक्षण : अनेक ठिकाणी दगडफेक,रास्ता रोको

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:47PMबीड : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी परळी येथेमोर्चा काढण्यात आला होता.  या मोर्चानंतर आरक्षणसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. परळीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी सकाळपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी दगडफेक झाली असून घाटनांदूर येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत. गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी आदी ठिकाणी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. माजलगाव येथे मराठा समाजातील तरुणांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. यावेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व त्या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी बीड येथून काही मराठा तरुण शुक्र्र्रवारी सकाळी परळी येथे गेले आहेत. परळी येथील आंदोलकांना सरकारने लेखी आश्‍वासन न दिल्याने अद्यापही हे आंदोलन सुरू आहे.

गेवराई ः तहसीलवर ठिय्या आंदोलन

येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी मराठा समाज बांधवांनी ठिय्या मांडला होता. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मेगा भरती रद्द झालीच पाहिजे, शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला होता. परळी येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी गेवराई येथे मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून आरक्षण देण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास ठोक मोर्चाला हिंसक वळण लागू शकते. याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील, असाही गर्भित इशाराही संतप्त भावना व्यक्‍त करताना मराठा बांधवांनी दिला. यावेळी तहसील प्रशासनाला मराठा समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले.गेवराई येथे आंदोलन होणार असल्याचे मेसेज व्हाट्सअ‍ॅपवर गुरुवारी रात्रीपासूनच व्हायरल होत होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी गेवराई शहरासह गढी, पाडळसिंगी, कोळागव, कोल्हेर, बागपिंपळगाव, गोविंदवाडी, सिंदखेड, राजपिंप्री, धोंडराई येथील तरुणांनी आंदोलनासाठी तहसीलसमोर गर्दी केली होती. यावेळी आंदोलकांनी मनोगत व्यक्त करून आरक्षणाची मागणी केली.

तरुणांनी जाळले टायर

अचानक अंबाजोगाई अहमदपूर रस्त्यावर जाळपोळ करून रास्ता रोको करण्यात आले. परळी दौंडवाडी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे घाटनांदूर व घाटनांदूरसह परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर आज घाटनांदूर, पूस, बरदापूर आदी ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू झाली आहेत. घाटनांदूर येथे काही तरुणांनी रस्त्यावर टायर जाळले.

तहसीलसमोर मुंडण करून नोंदवला निषेध

माजलगाव शहरात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनास गालबोट लागले असून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करत खाजगी वाहनांची तोडफोड केली. आंदोलन कर्त्यांनी गनिमी कावा करीत वेगवेगळ्या गटांत आंदोलन केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली. यावेळी काही आंदोलकांनी  तहसील कार्यालयासमोर सरकारच्या निषेर्धात मुंडण करून तहसीलदार यांना निवेदन दिले. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी व परळीतील ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माजलगाव  शहरात आंदोलन करण्यात आले.

परभणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदेलक तरुणांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये रिपाइंचे विजय साळवे यांच्या वाहनाची काच फुटली. यावेळी दगड लागल्याने काहीजण जखमीही झाले. यावेळी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही जमावाने दगडफेक केली.  पोलिसांनी संयम राखल्याने जमाव प्रक्षोभक झाला नाही. 

दरम्यान, राजेंद्र होके, सभापती जयदत्त नरवडे यांच्यासह काही आंदोलकांनी तहसीलसमोर मुंडण करून निषेध व्यक्‍त केला. यावेळी तहसीलदार झंपलवाड, उपविभागीय पोलसि अधिकारी नवटके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी  अशोक डक यांनी तरुणांना संयम राखण्याचे आवाहन केले.