Mon, Apr 22, 2019 04:20होमपेज › Marathwada › मराठा समाज आरक्षण : २ दिवसांत १० बसेस फोडल्या; सेवा बंद

मराठा समाज आरक्षण : २ दिवसांत १० बसेस फोडल्या; सेवा बंद

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 11:05PMपरभणी : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या प्रलंबित आरक्षण प्रश्‍नावर राज्यभर आंदोलन करण्यात येत असून त्याचे पडसाद परभणीतही उमटले. 19 जुलै रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी 6 बसेसची तोडफोड करण्यात आली. तर  20 जुलै रोजी आंदोलने व निदर्शने करण्यात आली. दरम्यान संतप्‍त झालेल्या युवकांनी घोषणाबाजी करून सकाळी 11 ते 1 वाजण्याच्या सुमारास शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार बस  फोडल्या.  

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत असल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उमटण्यास सुरुवात झाली आहे. 19 जुलैपासून आंदोलकांनी  राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला लक्ष्य करून तोडफोड करण्यास सुरुवात केली.19 जुलै रोजी गंगाखेड व परभणी आगारातील बस (क्र.एम.एच. 20 बी.एल. 1695 ),गंगाखेड-लोहा, नांदेड-गंगाखेड (क्र.एम.एच. 20 एस. 8761), लातूर-परभणी (क्र.एम.एच. 20 बी.एल. 3011), परभणी-नांदेड क्र.एम.एच. 20 बी.एल.3707 ,  सोलापूर-हिंगोली एम.एच.20 बी.टी. 3036, पंढरपूर-गंगाखेड एम.एच. 14 एच.टी. 0059 अशा एकूण 6 गाड्या प्रवासात असताना वेगवेगळ्या ठिकाणी अडवून फोडण्यात आल्या. 20 जुलै रोजी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळी 11 च्या सुमारास मराठा समाजातील युवकांनी निदर्शने केली.

यावेळी आंदोलनातील सहभागी युवकांनी घोषणाबाजी करून शासनाचा निषेध निषेध नोंदवला. दरम्यान वसमत रोडवर श्री शिवाजी महाविद्यालयासमोर  सकाळी  11 वाजता कळमनुरी-परभणी बस क्र. एम.एच.20 टी 9931 श्री शिवाजी महाविद्यालयासमोरून जात असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आली. याच ठिकाणी 12 वा  परभणी वसमत बस क्र. एम.एच. 14 बी.टी. 1363 वर दगडफेक केली. तर जिंतूर रोडवरील विसाफाटा येथे परभणी-जिंतूर बस क्र. एम.एच. 20 बी.एल. 0621 सकाळी 12.30 वाजता तर खानापूर फाटा परिसरात परभणी वसमत जाणारी बस क्र. एम.एच. 14 बी.टी. 1363 बसव  जमावाने बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. दरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसचे नुकसान झाले असून यातून परिवहन महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बसचालकाच्या फिर्यादीवरून गंगाखेड, परभणी या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परभणी आगाराचे प्रमुख जालिंदर सिरसाठ यांनी दिली. 

मराठा आरक्षणाचे पालममध्ये पडसाद ;

केरवाडीजवळ दोन एसटीच्या काचा फोडल्या

पालम :  केरवाडी गावाजवळ दोन एस.टी.बसच्या काचा फोडल्याची घटना दि. 19 जुलै रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठोक मोर्चाच्या माध्यमातून परळी (जि.बीड) येथे आंदोलन सध्या चालू आहे. याचे पडसाद दि.19 जुलै रोजी पालममध्ये उमटले. दोन एसटी बसच्या काचा फोडण्याची घटना घडली.  बस क्र एम.एच.06 एच. 8761  ही गंगाखेडहून निघून लोह्याकडे जात होती, तर दुसरी बस क्र.एम.एच. 20 बी.एल. 1695 ही लोह्याहून गंगाखेडकडे जात होती. दरम्यान सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास केरवाडी गावाजवळ या बस आल्या असता तेथे दोन दुचाकीवर आठ ते नऊ कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत बस थांबवून समोरच्या काचा फोडल्या. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते घोषणा देत निघून गेले. दोन्ही बसेस ठाण्यात लावल्या. गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तरडे हे करत आहेत.

अज्ञात व्यक्तीची एसटी बसवर दगडफेक 

सोनपेठ : तालुक्यातील उक्कडगाव मक्ता येथे अज्ञात व्यक्तीने लातूर-परभणी बसवर 19 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. लातूरवरून परभणीकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस (क्र. एम.एच.20 बी.एल 3611) ही 19 जुलैच्या दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील गंगाखेड-परळी रोडवरील उक्कडगाव मक्ता येथे आली असता बससमोर अज्ञात दहा ते बारा व्यक्ती तोंडाला रूमाल बांधून आले व चालकास ती थांबवण्यास सांगितले. बसवर  दगडफेक करून ते पसार झाल्याची माहिती बसचे चालक अनंता यादव व वाहक परमेश्वर पुंड यांनी दिली. यामध्ये बसची समोरची काच फुटली. याबाबत सोनपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.