Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Marathwada › परळीतील आंदोलनाला वाढता पाठिंबा

परळीतील आंदोलनाला वाढता पाठिंबा

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:14PMबीड : पुढारी वृत्तसेवा

परळी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रविवारीही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रास्ता रोको व आंदोलन करण्यात आले. परळीमध्ये रविवारी आंदोलनचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाचा निर्णय परळीतूनच ठरणार असल्याचे सांगितले. आरक्षणासाठी केज येथे आ. संगीता ठोंबरे यांच्या घरासमोर घंटानाद करण्यात आला. पाटोदा येथे आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन करून निषेध केला. तर, लिंबादेवी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पाटोदा : मराठा आंदोलनासाठी तालुक्यात तिसर्‍या दिवशीही आंदोलनाची धग कायम होती. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने रविवारी सकाळी दहा वाजता लिंबादेवी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे नगर-बीड रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तहसीलदार रुपा चित्रक व पोलिस निरीक्षक एस. जे. माने यांना निवेदन देण्यात आले. पाटोदा तहसील कार्यालय परिसरातही शुक्रवार पासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन तिसर्‍या दिवशी ही कायम आहे. मराठा आरक्षण आंदोलनला सर्व समाजघटकांनीही प्रत्यक्ष सहभागी होत पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे रविवारी दिवसभर पाटोदा शहरात पावसाची रिमझिम सुरु असताना देखील भर पावसात हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते.  येथील तहसिल कार्यालय परिसरात रविवारी युवकांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले, भर पावसात देखील हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते. यावेळी जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

आरक्षणासाठी पाठपुरावा करणार

अंबाजोगाई : परळीतील आंदोलनाला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश  आडसकर यांनी  पाठिंबा दिला. परळी येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल आहे. त्यादृष्टीने राज्यशासन काम करीत आहे. आरक्षणाबाबत सरकारने सभागृहात आश्‍वासन दिलेले आहे. त्यामुळे या आश्‍वासनाची निश्‍चित अंमलबजावणी होईल असा विश्‍वास व्यक्त केले. याप्रश्‍नी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन रमेश आडसकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी विलासराव सोनवणे, अ‍ॅड. माधव जाधव, वैजेनाथ सोनवणे, डॉ. वसंतराव उंबरे यांची उपस्थिती होती. 

आरक्षणाचा शासनादेश द्या

परळी : मराठा आरक्षणासाठी पाच दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा करण्यासाठी परळीत यावे, अशी भूमिका आबासाहेब पाटील यांनी मांडली. सोळा टक्के आरक्षणाचा जी.आर. द्यावा, त्याशिवाय हटणार नाही, असेही सांगितले. पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांनी जाणार नसल्याचे जाहीर केले असले तरी आमचे त्याकडे लक्ष असल्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला. 

बुधवारपासून मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी परळी (जि.बीड) येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी आंदोलकांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आबासाहेब पाटील म्हणाले, की सरकारने नोकरभरतीमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याचे सांगितले आहे, मात्र यावर मराठा समाजाचा विश्‍वास नाही. सरकारने या आरक्षणाचा जी.आर. (शासन आदेश) देण्याची मागणी त्यांनी केली, याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचेही ते म्हणाले. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यां साठी वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी आदींची मागणीही यावेळी करण्यात आली. हे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरुच राहणार असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवल्यास त्यास सरकार जबाबदार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यापुढे आंदोलनाची दिशा परळीतून ठरणार असल्याचे सांगून कोणी परस्पर निर्णय घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह संजय सावंत, अमित घाडगे, ज्योतिताई सपाटे आदींची उपस्थिती होती.