Wed, Jul 17, 2019 18:27होमपेज › Marathwada › आयुक्‍तांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही

आयुक्‍तांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 29 2018 10:53PMपरळी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी गेल्या बारा दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत असलेल्या मराठा बांधवांची रविवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी भेट घेतली. डॉ. भापकर यांनी सरकारने घेतलेला निर्णय आंदोलकांना सांगितला, यानंतर सायंकाळी पुन्हा बैठक झाली, मात्र आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी टाईमबाँड (निश्‍चित वेळ) द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व या संदर्भातील लेखी आश्‍वासन द्या, असे म्हणत आपले आंदोलन सुरूच ठेवले. एक ऑगस्ट रोजी राज्यभरात जेलभरो करण्यावरही आंदोलक ठाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मराठा समाजास आरक्षण द्या, मेगा भरती रद्द करा, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करा यासह इतर मागण्यांसाठी 18 जुलै पासून परळी येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण राज्यभर परसले आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने शनिवारी गटनेते व पक्षनेत्यांसह बैठक घेतली. या बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी परळीत आंदोलकांना वाचून दाखविले. त्यात म्हटले, आहे की राज्य मागासवर्ग आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात येईल आणि हा अहवाल आल्यानंतर तत्काळ विशेष अधिवेशन घेण्यात येईल. असे असले तरी या निवेदनातला हा मुद्दा आंदोलकांना मान्य नाही. दुसर्‍या मुद्यावर शासनाने मराठा समाजाच्या तरुणांना नोकर्‍यात स्थान देण्याचा विचार करूनच नोकर भरती करण्यात येईल असे आश्वासन दिले, मात्र आरक्षण मिळालेले नसताना अशा प्रकारे जागा राखून ठेवण्यात येणे शक्य नसल्याने हा मुद्दा आंदोलकांना मान्य झाला नाही.

आंदोलन काळात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत शासनाने अतिगंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले, परंतु याबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चातील आंदोलकांना विश्वास वाटत नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीच्या आणि विकासाच्या बाबतीत शासनाने दिलेले आश्वासनही मान्य होणारे नसल्याचे या आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी आंदोलन स्थळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, आंदोलनात बळी गेलेल्या चार तरुणांच्या कुटुंबाला प्रत्त्येकी 20 लाख तर जखमींच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्याची मागणी आबासाहेब पाटील यांनी केली.  मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन या सर्व मागण्या शासनाने आत्मीयतेने पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. आंदोलनाच्या बाराव्या दिवशीही शासनाने मागण्यांचा समाधानकारक विचार न केल्यामुळे हे आंदोलन पुढेही कायम राहील अशी घोषणा पाटील यांनी केली, तसेच एक ऑगस्ट रोजी जेलभरो करण्याचा निर्धारही केला. यावेळी राज्य समन्वयक महेश डोंगरे, संजय सावंत, अमित घाडगे, सुनील नागबे, रामेश्वर महाराज कोकाटे, ज्योतिताई सपाटे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर व हजारो आंदोलक उपस्थित होते.

डोंगरकिन्ही येथे रास्ता रोको

पाटोदा : तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे रविवारी सकाळी मराठा आरक्षण आणि मेगा भरती रद्द करावी या मागणीसाठी बीड-कल्याण मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. मराठा आरक्षण आणि विविध मागण्या घेऊन मराठा समाज बांधव ग्रामीण भागातही रस्त्यावर उतरत आहे. रविवारी सकाळी डोंगरकिन्ही येथे राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी करीत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. तहसीलदार रुपा चित्रक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डोंगरकिन्हीसह परिसरातील गावकर्‍यांची उपस्थिती होती.