होमपेज › Marathwada › तुळजापूर : मंत्रालयात घुसून जाब विचारू; मराठा मोर्चाचे दुसरे पर्व सुरू (Video)

तुळजापूर : मंत्रालयात घुसून जाब विचारू; मराठा मोर्चाचे दुसरे पर्व सुरू (Video)

Published On: Jun 29 2018 1:13PM | Last Updated: Jun 29 2018 6:49PMतुळजापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण, शेतकरी संरक्षण, मराठा समाजातील विद्यार्थांना शिक्षण शुल्कात सवलत यासह विविध मागण्या सरकारकडे प्रलंबीत आहेत. यावर अद्याप सरकारकडून कसलेच सकारत्मक पाऊल उचलले जात नसल्याने संतप्त मराठा समाज पुन्हा एकत्र आला आहे. त्यासाठी तुळजापुरात मंदिरासमोर तुळजाभवानी देवीचा जागर-गोंधळ घालून मराठा समाजाने नव्याने एल्गार पुकारला आहे. मराठा मोर्चाच्या दुसऱ्या पर्वास आजपासून (२९ जून) तुळजापुरातून सुरुवात करण्यात आली.

सकाळी ११ वा. शिवाजी महाराज पुतळ्यापासून हजारो सकल मराठा समाजबांधव घोषणा देत भवानी रोड मार्गे तुळजाभवानी मंदीरासमोर दाखल झाले. मागील आठ दिवस या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत होते. भगवे फेटे, झेंडे यामुळे तुळजापूर शहर भगवेमय झाले होते. तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांचा उद्घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरासमोरील प्रांगणात उभारलेल्या व्यासपीठावर तुळजाभवानी देवीचे पारंपारिक गोंधळी अनिल रसाळ आणि सहकाऱ्यांनी पारंपरिक चौक मांडून देवीचा गोंधळ घातला.

गोंधळाच्या कार्यक्रमानंतर मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी बोलताना सरकारवर सडकून टीका केली. कोपर्डी प्रकरणानंतर सकल मराठा समाजाने एकवटून आरक्षणासह विविध मागण्यांच्या संदर्भात आक्रमक होत राज्यभरात ५८ मराठा क्रांती मोर्चे काढले. हे सर्व मूक मोर्चे कसलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत शांततेत संयमाने पार पडले. आमची भूमिका संयमाची आणि सामंज्यस्याची होती. मात्र याचा गैरफायदा घेत सरकारने समाजाच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यात कोतेपणा दाखवत चालढकल केली. 

खोटी आश्वासने, फसव्या घोषणा करून उपसमिती नेमण्याचा फार्स करून समाजाला झुलवत ठेवले. सरकारने आता समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अन्यथा मंत्रालयात घुसून जाब विचारण्यास आम्ही कचरणार नाही. आमच्या मागण्या मान्य करण्यासदर्भात सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढचे मोर्चे मूक नसतील तर ठोक मोर्चे असतील, गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडू. आता कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेवर सडकून टीका केली.

या कार्यक्रमास जि.प.सदस्या अर्चनाताई पाटील, नगराध्यक्षा अर्चना गंगणे, माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर, शामलताई वडणे, मिना सोमाजी यांच्यासह महिला, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जिवनराजे इंगळे यांनी, मराठा समाज जितका सहनशील तितकाच आक्रमकही आहे, हा समाजाच्या न्याय्य हक्क अधिकाराचा लढा असून तो मिळवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असे सांगत सरकारच्या समाजाबद्दल असलेल्या निष्क्रीय भूमिकेवर टीका केली. यावेळी रमेश केरे-पाटील, सुनिल नागणे, सज्जनराव साळुंके अर्जुन साळुंके यांचीही भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे ठेवल्याचा आरोप करत सरकारवर सडकून टिका केली.

सकाळी ११ वा. शिवाजी पुतळ्यापासून मिरवणुकीने हजारो मराठा समाजबांधव घोषणा देत मंदीर परिसरात दाखल झाले. अग्रभागी कु. भक्ती अरविंद भोसले ही मुलगी जिजाऊ माँसाहेबांच्या पेहरावात अश्वारूढ होऊन लक्ष वेधून घेत होती. शेकडो झेंडे, फेटे यामुळे भवानी रोड भगवेमय झाला होता. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. परगावाहून आलेल्या समाजबांधवांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

मुस्लिम समाजाचे पाठिंब्यासह मोर्चात योगदान -

तुळजापूर येथील मुस्लिम समाजाने मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देत मराठा समाजबांधवांसाठी पाणी आणि अल्पोपहाराची सोय आंबेडकर चौक परिसरात केली होती. आरिफ बागवान, फिरोज शेख, अफसर शेख, मतीन बागवान यांच्यासह मुस्लिम समाजबांधव यासाठी परिश्रम घेत होते. मराठा समाजाच्या लढ्याला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिल्याबद्दल स्थानिक संयोजन समितीच्या वतीने जिवनराजे इंगळे, संदीप गंगणे यांनी आभार प्रकट केले. 

या कार्यक्रमात तरुणांनी शिस्तीचे पालन करत सार्वजनिक स्वच्छता पाळली. जमा झालेला कचरा संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. ५०० च्या वर स्वयंसेवकांनी नेमून दिलेल्या निर्धारित जागेवर आपले कर्तव्य बजावत कार्यक्रमात कसलाही, गोंधळ, शिस्तभंग होऊ दिला नाही.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक मराठा समाजबांधव मागील आठ दिवसांपासून तयारी करत होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी किशोर पवार, अर्जुन साळुंके, नितीन पवार, संदीप गंगणे, महेश गवळी, कुमारतात्या टोले, आण्णासाहेब क्षीरसागर, रोहन भांजी, जगदीश पाटील, मयुर कदम, नानासाहेब डोंगरे आदींसह शहरातील सकल मराठा समाजबांधवांनी परिश्रम घेतले.